नेर हे बाजारपेठेचे मोठे गाव आहे. गावातील लोकसंख्या मोठी असून शेती हाच येथील नागरिकांचा उदरनिर्वाहाचे साधन आहे. त्यामुळे येथील मुले आणि मुली शिक्षण घेऊन पोलीस, सैन्य भरतीसाठी प्रयत्न करीत असतात. आता कोरोनाचा काळही ओसरत असल्याने लवकरच पोलीस आणि सैन्य भरती निघेल अशी आशा मुला, मुलींना आहे. त्यामुळे ते आतापासूनच शैक्षणिक कागदपत्रे आणि इतर आवश्यक बाबींची पूर्तता करीत आहेत. त्यात उमेदवार हा कोणत्या गावाचा रहिवासी आहे. याचा पुरावा सादर करण्यासाठी एकाच अर्जावर गावातील सरपंच, पोलीस पाटील, तलाठी आणि ग्रामसेवक यांच्या सह्या आणि स्वाक्षऱ्या असलेला अर्ज ग्राह्य धरला जातो. त्यावर सरपंच, पोलीस पाटील, तलाठी यांच्या सह्या आणि शिक्के तत्काळ मिळत आहेत; परंतु ग्रामसेवक मात्र या कागदावर शिक्का आणि सही देण्यास नकार देत आहेत. त्यामुळे अनेक मुला, मुलींचे भविष्य हे अंधकारमय होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
ग्रामसेवक उशिरा येत असल्याने हेलपाटे
गावात ग्रामसेवक हा दुपारी बारा वाजेनंतर येत असल्याने अनेक नागरिकांना शेतीची कामे सोडून हेलपाटे मारावे लागतात. तर विद्यार्थ्यांनाही अनेक शैक्षणिक कागदपत्रांसाठी ग्रामपंचायतीत येऊन ग्रामसेवकाची वाट पाहावी लागते. त्यातही त्यांचा मूड चांगला असेल तर लगेच काम होईल, नाहीतर त्यात काहीतरी त्रुटी काढून माघारी फिरावे लागत आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या शेतातील कामेही हुकतात तर मुला, मुलींना सही शिक्क्यासाठी धुळे येथे बोलावले जाते; मात्र धुळे येथे जाऊनही ते भेटतीलच याची शाश्वती नसल्याने ग्रामसेवकाविषयी नाराजीचा सूर उमटत आहे.
एका अर्जासाठी भरतीची संधी हुकते
पोलीस आणि सैन्य भरतीसाठी कागदपत्रे तपासताना संबंधित अधिकारी हे सरपंच, पोलीस पाटील, तलाठी आणि ग्रामसेवकाच्या सह्या आणि शिक्का असलेल्या अर्जाची मागणी करतात. हा अर्ज नसेल तर भरतीला उभे केले जात नाही. त्यामुळे केवळ एका अर्जासाठी भरतीची संधी हुकत असते.
हेमांक्षी गवळे,रिया निकुंभे,वैष्णवी खैरनार विद्यार्थिनी, नेर
कोट
शासनाच्या नियमानुसार रहिवासी दाखला देता येत नाही ग्रामसेवक राजेंद्र कुवर
Attachments area