धुळे : येथील अनेकांच्या रेशन कार्डमधील काही सदस्यांची नावे ऑनलाइनप्रणालीतून गायब होऊन ती नावे चक्क नाशिक जिल्ह्यातील रेशन कार्डला जोडली गेल्याची तक्रार जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे. याबाबत इंडियन युनियन मुस्लीम लीगने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, गेल्या काही महिन्यांपासून धुळे शहरातील रेशनकार्डधारक अडचणीत सापडले आहेत. अनेक रेशनकार्डमधील काही सदस्यांची नावे नाशिक जिल्ह्यात वर्ग झाली आहेत. ऑनलाइनप्रणालीत ही नावे नाशिक जिल्ह्यातील रेशनकार्डधारकांना जोडली गेल्याचे दिसत आहे. धुळ्यात रेशन दुकानात थंब दिल्यानंतर केवळ दोन ते तीन सदस्यांची नावे समोर येत आहेत. इतकी गंभीर चूक झाली कशी, असा प्रश्न संबंधितांना पडला आहे. पुरवठा विभागाला ही बाब लक्षात आणून दिल्यानंतर, नाशिक जिल्ह्यातून नाव कमी केल्याचा दाखला आणल्यावरच धुळ्यात नावे समाविष्ट होतील, असे रेशन दुकानदार आणि पुरवठा विभागाचे म्हणणे आहे; परंतु रेशन कार्डधारक कामगार, कष्टकरी कुटुंबातील आहेत. रोजगार बुडवून नाशिकला जाण्याइतपत त्यांची परिस्थिती नाही. विशेष म्हणजे ऑनलाइनप्रणालीमुळे हा प्रकार घडला असला तरी कुणीतरी ही नावे चुकून नाशिक जिल्ह्यात टाकली असतील, अशी शंका आहे. प्रशासनाच्या चुकीचा सामान्यांना भुर्दंड का, असा प्रश्न निवेदनात उपस्थित केला आहे. नावे कमी झाल्याने धान्यदेखील कमी मिळत आहे. त्यामुळे पुरवठा विभागाने चूक दुरुस्त करून धुळ्याची नावे नाशिक येथून काढावीत आणि धुळ्यात समाविष्ट करावीत, अशी मागणी आहे.
धुळ्याच्या रेशनकार्डमधील नावे चक्क नाशिक जिल्ह्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2021 04:31 IST