गेल्या महिन्यातच तालुक्यातील ३४ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीची प्रक्रिया आटोपली असली तरी सरपंचपदाची निवडणूक अद्याप झालेली नसल्याने गावोगावी राजकीय वातावरण तापत आहे़ अशातच आता तालुक्यातील १७ ग्रामपंचायतींची ११ रोजी तर उर्वरित १७ ग्रामपंचायतींची १२ रोजी सरपंच-उपसरपंच पदाच्या निवड प्रक्रियेसाठी पहिली सभा घेण्यात येणार आहे़ यासाठी अव्वल कारकून व मंडळ अधिकाऱ्यांची अध्यासी अधिकारी म्हणून निवड झाली आहे़
सरपंच पदाचे आरक्षण २८ जानेवारी रोजी तर महिला सरपंच पदाचे आरक्षण २ फेब्रुवारी रोजी काढण्यात आले़ तालुक्यातील ३४ पैकी काही गावातील सदस्य मतमोजणी झाल्यापासून लगेच फिरायला निघून गेले आहेत़ लवकरच निवड होईल या अपेक्षेने ते होते़ अद्यापही ते परतलेले नाहीत़ तशातच पुन्हा महिला आरक्षणाच्या दिवशी काही सदस्य देखील फिरण्यासाठी निघून गेले आहेत़ फिरण्यासाठी गेलेले सदस्य अद्याप परतले नसले तरी त्यांना ११ तारखेची वाट पाहावी लागणार आहे़ विशेषत: काही गावात सरपंच निवड अटीतटीची होणार असल्यामुळे ते सदस्यही देवदर्शनाला निघून गेले आहेत़
काही गावांमध्ये एका पॅनलला बहुमत असले तरी सरपंचपदाचा उमेदवार अन्य विरोधी पॅनलजवळ असल्याने फोडाफोडीचे राजकारण सुरू झाले आहे़ याकरिता गावागावांत राजकीय गावपुढारी व पॅनलप्रमुख दैनंदिन घडामोंडीवर लक्ष ठेवून तशा हालचाली गतिमान करीत आहेत़
सरपंच निवड
११ रोजी असली, बलकुवे, कुवे, घोडसगांव, चाकडू, बाळदे, वाठोडे, होळ, हिंगोणी बु़, उप्परपिंड, दहिवद, नटवाडे, कळमसरे, जामन्यापाडा, हिंगोणीपाडा, गरताड, पिंपळे तर १२ फेब्रुवारी रोजी भटाणे, भाटपुरा, साकवद, जातोडा, टेकवाडे, बोरगांव, जुने भामपूर, भावेर, मांडळ, वरूळ, विखरण, शिंगावे, भोरखेडा, सावळदे, बाभुळदे, जवखेडा, शेमल्या या गावांचा समावेश आहे़