धुळे : मालेगावकडून चाळीसगावच्या दिशेने जाणाऱ्या दुचाकीचा झालेल्या अपघातात एमआयएमचे धुळे जिल्हाध्यक्ष समसुलहुद्दा मोहम्मद शाह (५८) हे गंभीर जखमी झाले होते. त्यांना नाशिक येथे वैद्यकीय उपचारासाठी नेत असताना त्यांची प्राणज्योत मालवली. तर त्यांच्यासोबत असलेला दुचाकीस्वार तरुण मोहम्मद जुनैद नईम अहमद (२०) या तरुणाचा जागीच मृत्यू झाला. सोमवारी दुपारी पावणे चार वाजेच्या सुमारास मालेगाव शहराजवळील चाळीसगाव फाट्यावर हा भीषण अपघात झाला. मालेगाव येथील कमालपुरा भागात राहणारा मोहम्मद जुनैद हा समसुलहुदा यांच्यासह दुचाकीने भंगार माल खरेदीसाठी जात होता. अंबिका हॉटेलजवळ बारीच्या चढावर मालवाहतूक ट्रकने दुचाकीला धडक दिली. यात चेहऱ्यावरुन ट्रकचे टायर गेल्याने जुनैदचा जागीच मृत्यू झाला. तर समसुलहुदा शाह यांच्या पायास गंभीर दुखापत झाली. अपघाताची माहिती मिळाल्याने मालेगाव तालुका पोलिसांनी घटनास्थळी पोहचून जुनैदचा मृतदेह सामान्य रुग्णालयात हलविला. समसुलहुदा यांना तातडीने येथील खासगी रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र, त्यांचा पाय पूर्णपणे निकामी झाल्याने त्यांना पुढील उपचारार्थ नाशिक येथील खासगी रुग्णालयात घेवून जात असतानाच त्यांचा वाटेत मृत्यू झाला.दरम्यान, अपघातानंतर फरार झालेल्या ट्रकचालकाला पोलिसांनी मनमाड चौफुली परिसरात पकडले. याप्रकरणी मालेगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. समसुलहुदा शाह यांचा मृतदेह धुळ्यात आणला असून सायंकाळी चाळीसगाव रोडवरील कब्रस्थानमध्ये दफनविधी केला जाणार आहे.
एमआयएमचे धुळे जिल्हाध्यक्ष अपघातात ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 5, 2021 17:12 IST