भूषण चिंचोरे
धुळे - कोरोनाकाळानंतर समाजातील अनेकांना विविध प्रश्नांना तोंड द्यावे लागते आहे. यामुळे ताणतणाव वाढून कलह निर्माण झाले आहेत. अशा परिस्थितीत संवाद ठेवणे महत्त्वाचा आहे. संवादाची दरी निर्माण झाली तर मानसिक स्वास्थ्य बिघडण्याचा धोका निर्माण झाला आहे.
कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे लागलेल्या लॉकडाऊनमुळे अनेकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. तर काहींचे व्यवसाय ठप्प झाले आहेत. कोसळलेली बेरोजगारीची कुऱ्हाड, आर्थिक नुकसान व एकाकी पडल्याने नैराश्याचे प्रमाण वाढले आहे. नैराश्य घालवण्यासाठी संवाद महत्त्वाचा आहे. कुटुंबातील सदस्य, मित्र, सहकारी यांच्याशी मनमोकळा संवाद साधणे आवश्यक आहे.
मन हलके करणे हाच उपाय
- कोरोनाच्या काळात नेहमीपेक्षा जास्त संपर्क आल्याने समायोजन करणे कठीण गेले.
- बेरोजगारी व आर्थिक संकटे आल्याने नैराश्य व चिंतेचे विकार वाढले आहेत.
- मन हलके करणे, व्यक्त होणे हाच यावरच उत्तम उपाय आहे.
- कुटुंबातील सदस्य, सहकारी व मित्रांशी मनमोकळा संवाद साधला पाहिजे.
मानसोपचार तज्ज्ञ म्हणतात...
नोकरी गेल्यामुळे व आर्थिक संकटांमुळे घरा-घरात कलह वाढले आहेत. तसेच घरातच राहिल्याने नेहमीपेक्षा अधिक संपर्क आल्यानेही एकमेकांना समजून घेणे कठीण गेले. एकमेकांशी मनमोकळेपणाने बोलले पाहिजे. संवाद वाढवणे आवश्यक आहे.
- डॉ. तुषार भट, मानसोपचार तज्ज्ञ
कोरोनानंतर नैराश्य वाढले आहे. त्यामुळे व्यसनाधीनतादेखील वाढली आहे. त्यामुळे कलह निर्माण झाले आहेत. निराशा वाटत असेल तर जवळच्या व्यक्तींशी बोलणे, मन मोकळे करणे गरजेचे आहे. गरज भासली तर मानसोपचार तज्ज्ञांची मदत घ्यावी.
- डॉ. जीवन पवार, मानसोपचार तज्ज्ञ