आरोग्य यंत्रणेसोबतच इतर विभागांशी ठेवलेला उत्तम समन्वय, लसीकरणाच्या आधीच नियोजनानुसार केलेली पूर्वतयारी, वरिष्ठांचा पाठिंबा व मार्गदर्शन यामुळे कोरोना लसीकरणात राज्यात आघाडी घेऊ शकलो, अशी प्रतिक्रिया जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.संतोष नवले यांनी लोकमतशी बोलताना व्यक्त केली. आरोग्य कर्मचाऱ्यांसोबतच कोरोना काळात पुढे असलेल्या फ्रंटलाईन कर्मचाऱ्यांच्या लसीकरणाला सुरुवात झाली असल्याची माहिती त्यांनी दिली.
प्रश्न - कोरोना लसीकरणाचे नियोजन कसे केले?
उत्तर - कोरोना लसीकरणासाठी शासनाने कोवीन हे ॲप विकसित केले आहे. लसीकरणापूर्वी आरोग्य कर्मचाऱ्यांची नोंदणी त्यात करणे आवश्यक होते. जिल्ह्यातील किती आरोग्य कर्मचाऱ्यांना लस द्यायची आहे त्यांची माहिती एकत्रित केली. शासकीय व खासगी क्षेत्रातील आरोग्य कर्मचाऱ्यांची संपूर्ण माहिती कोवीन ॲपमध्ये भरून घेतली. लसीकरणापूर्वी आरोग्य कर्मचाऱ्यांशी संपर्क साधला. त्यांच्या मोबाइलवर संदेश धाडण्यात आले. तसेच त्यांना वैयक्तिक फोन करून लसीकरणाबात माहिती दिली.
प्रश्न - कर्मचाऱ्यांच्या मनातील भीती कशी दूर केली?
उत्तर - आतापर्यंत लहान बालकांचे लसीकरण होत होते. कोरोनाची लस मात्र प्रौढांना दिली जाणार होती. तसेच इतर लस ४ ते ५ वर्षात तयार करण्यात आल्या आहेत. कोरोनाची लस मात्र वर्षभरात विकसित करण्यात आली आहे. कोरोनाची लस व इतर लसमध्ये हा प्रमुख फरक आहे. सुरुवातीला आरोग्य कर्मचाऱ्यांमध्ये काहीशी भीती होती. मात्र लस सुरक्षित व परिणामकारक असल्याची खात्री होती. सर्वप्रथम लस स्वतः टोचून घेतली. त्यामुळे इतर कर्मचाऱ्यांमध्येही विश्वास निर्माण झाला. आजारी असलेल्या कर्मचाऱ्यांना सोडून इतर सर्व आरोग्य कर्मचाऱ्यांनी लस टोचून घेतली. लसीकरणाची भीती दूर झाल्यामुळे लस टोचून घेण्यास नकार देणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांचे प्रमाण नगण्य होते.
प्रश्न - लस घेतल्यानंतर किती कर्मचाऱ्यांना त्रास झाला?
उत्तर - लस घेतल्यानंतर रोगप्रतिकारक शक्ती निर्माण होत असते. त्यामुळे कोणतीही लस टोचून घेतल्यानंतर सौम्य स्वरूपाचा त्रास होतो. यात डोके दुखणे, मळमळ होणे, उलटी व ताप असा त्रास होतो. आतापर्यंत लस घेतल्यानंतर केवळ एक कर्मचाऱ्याला सौम्य स्वरूपाचा त्रास झाला आहे. थोड्या वेळाने त्या कर्मचाऱ्याला बरे वाटू लागले होते. लस पूर्णपणे सुरक्षित व प्राणरक्षक आहे. त्यामुळे लसबाबत भीती बाळगू नये.
प्रश्न - दुसऱ्या टप्प्यात कोणत्या क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना लस मिळणार?
उत्तर - आरोग्य क्षेत्रातील कर्मचाऱ्यांचे लसीकरण सध्या सुरू आहे. यात शासकीय तसेच खासगी रुग्णालयातील डॉक्टर व आरोग्य कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. आता पुढील टप्प्यात फ्रंटलाईन वर्कर यांचे लसीकरण होईल. याचाच भाग म्हणून मागील दोन दिवसांपासून पोलीस अधिकारी, कर्मचारी व होमगार्ड यांचे लसीकरण सुरू केले आहे. पत्रकारांनाही लस दिली जाणार आहे. त्याबाबत चर्चा सुरू आहे. आरोग्य कर्मचारी व पोलीस कर्मचाऱ्यांचे लसीकरण पुढील १५ दिवसात पूर्ण होईल.
वरिष्ठांचे मार्गदर्शन व पाठिंब्यामुळे यश -
जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष व आरोग्य सभापती यांनी केलेले मार्गदर्शन व पाठिंबा दिल्यामुळे लसीकरणात यश मिळवू शकलो. लसीकरणाबाबत योग्य नियोजन व पूर्वतयारी केल्यामुळे ५३ टक्के लसीकरण आतापर्यंत पूर्ण झाले आहे. लसीकरणात इतर जिल्ह्यांच्या तुलनेत पहिल्या दिवसापासूनच धुळ्याने आघाडी घेतली आहे.
पुरेसे फ्रीजर उपलब्ध -
लस साठवण्यासाठी फ्रीजर असणे महत्त्वाचे असते. त्यासाठी आयएलआर प्रकारातील फ्रीजर आवश्यक असतात. जिल्ह्यात ६० आयएलआर फ्रीजर उपलब्ध होते. तसेच राज्य शासनाकडून ७ फ्रीजर उपलब्ध करून दिले आहेत.