निजामपूर : सद्यस्थितीत भीषण दुष्काळाचे सावट असून भूगर्भातील जलसाठेही आटले आहेत. यामुळे ‘पाणी आडवा, पाणी जिरवा’ सारखे उपक्रम भविष्यात उपयोगी ठरणार आहे. या पार्श्वभूमीवर निजामपूर येथील भारतीय किसान संघाचे उपाध्यक्ष दुल्लभ माळी यांनी आपल्या जन्मदिनी लहान पाझर तलाव बांधण्याचा संकल्प केला होता. १३ रोजी खुडाणे रस्त्याजवळ या पाझर तलाव कामाचा शुभारंभ करण्यात आला.चंपकलाल शहा व जैताणेचे सामाजिक कार्यकर्ते प्रकाश पाटील यांच्याहस्ते कामाचा शुभारंभ झाला. यावेळी माळी यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. याप्रसंगी जगदिश शाह, निलेश शहा, रवी शहा, योगेश सोनवणे, अशोक काटके, सुनिल जगदाळे, रामराव गवळे, कमलेश भामरे, सदा बोरसे, भरत जाधव, महेश बोरसे, छबुलाल काळे, पुंडलीक खैरनार, रवी जाधव आदी उपस्थित होते.निजामपूर-जैताणे पंचक्रोशीत दुष्काळाचे चटके बसत आहेत. मात्र, परिसरात पाण्यासाठी दिर्घकालीन अशी कोणतीही उपाययोजना राबवलेली नाही. खुडाणे रस्त्यावर शिवसडे शिवार हे जैताणेपासून ३ कि.मी. अंतरावर आहे. लगतच्या डोंगरावरील पाणी नाल्यातून वाहून जाते. ते पाणी अडविले गेले तर जलसिंचन होईल. त्यामुळे या नाल्यावर लहान पाझर तलाव बांधण्याचा निर्णय घेतला आहे. शक्य झाल्यास स्वखर्चातून किंवा लोकवर्गणीतून हे काम करण्यात येईल, असे माळी यांनी सांगितले.
जैताणे येथील पाझर तलावाच्या कामाचा शुभारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2019 22:49 IST