धुळे : येथील मोहाडी उपनगरात एका खासगी हाॅटेलमध्ये सुरू असलेल्या साखरपुड्याच्या समारंभात साडेपाच लाखांचे दागिने चोरीला गेल्याची घटना घडली. रविवारी सायंकाळी सात वाजताच्या सुमाराला गुरुद्वाराजवळील कान्हा रेजेन्सीमध्ये साखरपुड्याच्या कार्यक्रमात ही चोरी झाली. याप्रकरणी सोमवारी सायंकाळी गुन्हा दाखल झाला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ५ लाख २० हजार रुपये किमतीचे डायमंड व रेडअम सोन्यामध्ये मढवलेले झुमके, ३८ हजार रुपये किमतीची सोन्याची अंगठी असे एकूण ५ लाख ५८ हजार रुपये किमतीचे दागिने चोरीला गेले आहेत. संजय पुरुषोत्तमदास गिंदोडिया रा. कोरके नगर धुळे यांच्या कुटुंबातील व्यक्तीचा साखरपुडा समारंभ होता. कार्यक्रमाच्या स्टेजवर पाटावर हे सर्व दागिने ठेवलेले होते. साखरपुड्याला पाहुण्यांची गर्दी असतानादेखील चोरट्यांनी नजर चुकवून दागिने लंपास केले. त्यामुळे आश्चर्य व्यक्त होत आहे.याप्रकरणी संजय गिंदोडिया यांनी दिलेल्या फिर्यादीवरून मोहाडी पोलीस ठाण्यात भादंवि कलम ३७९ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलीस उप-निरीक्षक एम. आय. मिर्झा करीत आहेत.या चोरीच्या तपासाचे पोलिसांपुढे आव्हान आहे.
साखरपुड्यातून सव्वापाच लाखांचे दागिने लपांस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2020 21:46 IST