सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या अतिदुर्गम भागात शिरपूर - चोपडा सीमेवर उबंर्टी हे गाव आहे. याच नावाचे गाव मध्य प्रदेशमध्येही आहे. याठिकाणी सर्रासपणे गावठी पिस्तूल तयार करण्याचा व्यवसाय चालतो, असे पोलिसांनी केलेल्या कारवाईवरून स्पष्ट होते. कारण पोलिसात आतापर्यंत जे पण गुन्हे दाखल झाले आहेत, त्याची तार या दोन्ही गावाशी जोडलेली आहे. गावांमध्ये पाच हजार रुपयातही पिस्तूल उपलब्ध होते. पण ती प्रत्येकाला मिळत नाही. तर त्यासाठी ओळख लागते. हा धंदा करणाऱ्याची एक लिंक (साखळी) आहे. त्यामार्फत गेले तरच ती मिळते अन्यथा अनोळखी माणूस गेला तर त्याचे काय बरेवाईट होईल, याचा विचार जाणाऱ्या व्यक्तीनेच करावा, अशी दहशत आहे. या भागात एकटा दुकटा व्यक्ती तर जाऊ शकतच नाही, अशी परिस्थिती आहे. पोलीस सुद्धा याभागात पथक घेऊनच जातात, रात्री तर त्यांचीही हिंमत होत नाही, असे सांगितले जाते. पिस्तूल तयार करण्यासाठी हे लोक जुने लोखंड वापरतात. पिस्तूलची बनावट ही विदेशी असली तरी तो देशी कट्टा असल्याने तो लगेच लक्षात येतो.
बनावट पिस्तूल विक्री प्रकरणात अटक करण्यात आलेले संशयित आरोपी अटक झाल्यानंतर जामिनावर सुटतात आणि परत त्याच उद्योगाला लागतात. ते नंतर लवकर पोलिसांच्या हाती लागत नाही, त्यामुळे हा धंदा बंद होण्याऐवजी तेजीने वाढतो आहे. यात दाखल झालेल्या गुन्ह्यामध्ये अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये ३० ते ३५ वयोगटातील तरुण मंडळी जास्त असल्याचे दिसते. पुणे, नाशिक येथे तर पाच हजारात कट्टा मिळतो म्हणून महाविद्यालयीन तरुण मंडळी सहज या मोहात पडतात. आणि पाच हजारात कट्टा घेऊन हौस म्हणून जवळ बाळगतात. आणि मग किरकोळ कारणावरून त्याचा वापरही करतात आणि त्यातून खून केल्याच्या घटनाही घडल्या आहेत. तर सराईत गुन्हेगार हा कट्टा दरोडे आणि लुटीच्या घटना घडविण्यासाठी वापरतात.
नेहमीच बनावट पिस्तूलसह अटक केलेले हे संशयित आरोपी पोलीस कोठडी संपल्यावर जामिनावर सुटतील, नंतर या घटनेचा तपास नेहमीप्रमाणे तेथेच थांबेल. हा धंदा कुठे चालतो हे पोलिसांनाही माहिती आहे. तरीही धंदा तेजीत सुरू असून त्याची पाळेमुळे हळूहळू जिल्ह्यासह संपूर्ण राज्यात पसरली आहे. त्याचा विस्तार आणखी वाढतोच आहे. हे जिल्ह्याच्या दृष्टीने हे घातक आहे. म्हणूनच पोलिसांनी याकडे गांभीर्याने लक्ष देऊन हा बनावट पिस्तूल तयार करण्याचा धंदा समूळ नष्ट केला पाहिजे. नाहीतर बनावट दारूची जी कीड या जिल्ह्याला लागली तशीच बनावट पिस्तूल विक्रीच्या धंद्याचीही लागेल. जर पाच हजारात पिस्तूल मिळाली तर जिल्ह्यात गुंडराज निर्माण होईल, आणि त्याला पोलीस प्रशासन जबाबदार राहील.