धुळे : मागासवर्गीयांच्या विविध प्रश्नांसाठी ऑल इंडिया पॅंथर सेना आणि रिपब्लिकन स्टुडंट युनियनतर्फे धुळे शहरात जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर नुकतेच आंदोलन करण्यात आले. जोरदार घोषणाबाजी करीत निदर्शने केली. तसेच या मागण्यांसाठी भविष्यात तीव्र स्वरुपाचे आंदोलन उभारण्यात येईल, असा इशाराही या संघटनांनी दिला आहे.
यावेळी जिल्हा प्रशासनाला निवेदन देण्यात आले. राज्यात १२ हजार ८९१ ॲट्राॅसिटीचे खटले न्यायालयात प्रलंबित आहेत. तसेच ७७१ गुन्हे पाेलीस तपासाअभावी प्रलंबित आहेत. तपासकामात कसूर करणाऱ्या अधिकाऱ्यांवर याेग्य ती कारवाई करावी, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाकडून सरकारी वकिलाची नियुक्ती करावी, तक्रारदारांवर दडपण आणण्यासाठी परस्परविरोधी तक्रारींचे प्रमाण राज्यात वाढले आहे. त्याची पाेलीस अथवा दक्षता पथकाकडून काेणतीही दखल घेतली जात नाही. जिल्हा, विभाग, राज्य दक्षता व नियंत्रण समिती अत्याचार राेखण्यात अपयशी ठरली आहे. त्यामुळे या समित्या बरखास्त करून त्यावर नवीन सक्षम प्रतिनिधींची नियुक्ती करावी, ॲट्राॅसिटी पीडितांना पाेलीस संरक्षण द्यावे, त्यांना शस्त्र बागळण्याची कायदेशीर परवानगी द्यावी, जिल्हा दक्षता समितीचे पुनर्गठण करावे, महार वतनाच्या जमिनीवरील अतिक्रमण हटवावे, दादासाहेब गायकवाड सबलीकरण याेजनेतून शेतजमिनी उपलब्ध करून द्याव्यात, भीमा काेरेेगावप्रकरणी दाखल केलेेले गुन्हे मागे घ्यावेत, याबाबत याेग्य ती कारवाई करावी, कारवाई करण्यास राज्य सरकार अपयशी ठरत असेल, तर राज्यपालांनी राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याचा प्रस्ताव पाठवावा आदी मागण्या निवेदनात केल्या आहेत.
आंदोलनात संघटनेचे जिल्हाध्यक्ष सागर माेहिते, ॲड. विलास भामरे, शहराध्यक्ष आकाश बैसाणे, शुभम येवले, बापू नागमल, अमाेल शिरसाठ, समीर पठाण, कालू सय्यद, भाऊसाहेब बळसाणे, आनंद अमृतसागर, जितेंद्र साेनवणे, नीलेश गजभिये आदी सहभागी झाले होते.