धुळे : जिल्हा परिषद व त्याअंतर्गत येणाऱ्या पंचायत समित्यांच्या पोटनिवडणुकीसाठी राज्य निवडणूक आयोगाने निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. निवडणूक कालावधीत ‘पेड न्यूज’ बाबतच्या तक्रारींवर चौकशी करून निर्णय घेण्यासाठी जिल्हाधिकारी संजय यादव यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठित करण्यात आली आहे, अशी माहिती उपजिल्हाधिकारी हेमांगी पाटील यांनी दिली.
स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसाठी उमेदवारांनी करावयाच्या खर्चावर राज्य निवडणूक आयोगाने निर्बंध घातलेले आहेत. निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांनी राज्य निवडणूक आयोगाने विहीत केलेल्या मर्यादेपेक्षा जास्त खर्च केल्यास उमेदवारास अनर्ह ठरविण्याचे अधिकार निवडणूक आयोगास आहेत. राज्य निवडणूक आयोगाने १६ जानेवारी २०१२ रोजीच्या पत्रान्वये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या अनुषंगाने छापील प्रसार माध्यमांवर देण्यात येणाऱ्या ‘पेड न्यूज’ संदर्भात आलेल्या तक्रारींवर चौकशी करून निर्णय घेण्यासाठी समिती गठित करण्याबाबत नमूद केले आहे.
निवडणूक कालावधीत वर्तमानपत्रांमध्ये बातम्यांच्या स्वरूपात जाहिरात केली जाते. अशा जाहिरातीचे दृश्य स्वरूप जरी बातमीसारखे असले, तरी प्रत्यक्षात प्रसारमाध्यमांना किंमत देऊन अशा बातम्या छापून आणल्या जातात. अशा बातम्यांना ‘पेड न्यूज’ असे संबोधण्यात येते. छापील प्रसारमाध्यमांद्वारे देण्यात येणाऱ्या जाहिरातींवर कोणतीही कार्यवाही करण्यात येत नाही. तसेच निवडणुकीस उभे असलेले उमेदवार जाहिरात व बातम्यांवरील खर्च कुठेही दर्शवित नाही किंवा निवडणूक खर्चामध्ये समाविष्ट करीत नाही.
या पार्श्वभूमीवर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या अनुषंगाने छापील प्रसारमाध्यमांवर देण्यात येणाऱ्या ‘पेड न्यूज’च्या संदर्भात आलेल्या तक्रारींवर चौकशी करून निर्णय घेण्यासाठी ही समिती गठित करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी संजय यादव हे या समितीचे अध्यक्ष आहेत. याशिवाय पोलिस अधीक्षक यांचे प्रतिनिधी, अपर जिल्हाधिकारी दिलीप जगदाळे, प्रेस कौन्सिल ऑफ इंडियाचे नामनिर्देशित प्रतिनिधी, निवडणूक निर्णय अधिकारी (धुळे, साक्री, शिरपूर, शिंदखेडा), तहसीलदार धुळे, साक्री, शिरपूर, शिंदखेडा हे सदस्य असतील, तर जिल्हा माहिती अधिकारी अर्चना देशमुख या समितीच्या सदस्य सचिव असतील.