धुळे : बंदी असलेला नायलॉनचा मांजा बेकायदा विक्री करत असताना शहर पोलिसांच्या पथकाने दोन ठिकाणी छापा टाकून पकडला. मुद्देमालासह दोन जणांना पोलिसांनी अटक केली आहे. ही कारवाई सोमवारी रात्री साडेसात वाजेच्या सुमारास करण्यात आली असून, रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. पतंग बनविणे, मांजा बनविण्याचे काम शहरात ठिकठिकाणी केले जाते. पतंग आणि मांजा बनविल्यानंतर त्यांच्याच स्टॉलवरून त्याची विक्री केली जाते. पतंग बनविणे आणि विक्रीला काही अडचण नसली तरी नायलॉनचा मांजा तयार करणे आणि त्याच्या विक्रीला कायद्याने परवानगी नाही. याची माहिती असतानादेखील स्वत:च्या आर्थिक फायद्यासाठी शहरात बऱ्याच ठिकाणी छुप्या पध्दतीने नायलॉनचा मांजा बनवून त्याची विक्री होत असल्याबाबतचे वृत्त ह्यलोकमतह्णने प्रसिध्द करुन प्रशासनाचे लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न केला होता.त्यानुसार, शहर पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने अकबर चौक आणि मोगलाई या भागात जाऊन अचानक कारवाई केली. पोलिसांनी बेकायदा असलेला चक्रीत गुंडाळलेला नायलॉनचा मांजा पकडला. दोन गोण्यांमध्ये सुमारे ९० ते १०० चक्री पोलिसांनी जप्त केल्या आहेत. पकडण्यात आलेला मुद्देमाल हा हजारो रुपयांचा असल्याचे पोलीस निरीक्षक देशमुख यांनी सांगितले. दरम्यान, ही कारवार्ई सायंकाळी उशिरा झाली असून गुन्हा दाखल करण्याचे काम उशिरापर्यंत सुरू होते.
बेकायदा नायलॉनचा मांजा, शहर पोलिसांनी पकडला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2021 22:13 IST