कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या वाढत्या संसर्गामुळे पुन्हा राज्यात लाॅकडाऊन घोषित करून जनजीवन ठप्प झाले होते. या लाटेत सर्वात जास्त ग्रामीण भागात नुकसान दिसून आले. लहान- लहान गावे हाॅटस्पाॅट ठरली. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर राज्य परिवहन महामंडळाच्या बसेस पुन्हा रस्त्यावर धावू लागल्या. कोरोना जनजागृती करण्यासाठी मोठे ठळक बॅनर, फलक, बसेसच्या मध्यभागी ‘मास्क नाही, प्रवेश नाही’ अशा मार्गदर्शक सूचना लिहिल्या आहेत. मात्र तरीदेखील काही प्रवाशांच्या तोंडावर मास्क दिसून येत नाही, तर काहीजण हनुवटीवरच मास्क लावतात. यामुळे या सूचनांकडे नागरिक तसेच प्रवाशांचे दुर्लक्ष होत असून, याबाबत गांभीर्य दिसून येत नाही. यामुळे एवढी हानी होऊनदेखील यातून आपण अजून काहीच बोध घेतला नाही, असेच म्हणावे लागेल.
कोराेनाच्या नियमांचे पालन करणे हे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे. तरच आपण या महामारीला हरवू शकतो, त्याच्यावर मात करू शकतो. सात जूनपासून जवळजवळ दोन महिन्यांपासून बंद असलेली एसटी सेवा चालू झाली आहे. यात प्रत्येक प्रवाशांजवळ मास्क, सॅनिटायझर असणे बंधनकारक करण्यात आले आहे. मात्र या नियमांचे काटेकोर पालन होताना दिसून येत नाही. यासाठी कडक अंमलबजावणी करावी लागेल.