धुळे : पूर्वी वाहतुकीची साधने कमी होती, त्यामुळे बहुतांशजण गावात पायीच जायचे. मात्र, आता जवळपास सर्वांकडेच स्वयंचलित वाहने आली. त्यामुळे पायी चालण्याची सवय जवळपास सुटली. त्यामुळे वयाच्या ४०व्या वर्षीच गुडखा, कंबरदुखीच्या समस्यांना अनेकांना तोंड द्यावे लागत आहे.
हाडांच्या मजबुतीसाठी आवश्यक असलेले डी जीवनसत्त्व सकाळच्या कोवळ्या उन्हातून मिळते. नियमित चालण्याने दीर्घायुष्य लाभत असते. तसेच रक्तदाबही नियंत्रित राहू शकतो. नियमित चालण्याने वजन नियंत्रित राहते. मनाच्या एकाग्रतेसाठी, चिंतनासाठी चालणे हा एक चांगला व्यायाम आहे. सकाळी चालण्यामुळे हवेतील शुद्ध ॲाक्सिजनचा पुरवठा शरीराला होत असतो.
या कारणासाठी होतेय चालणे
ज्येष्ठ - व्यायाम म्हणून, प्रकृती चांगली राहावी यासाठी सकाळ-संध्याकाळ चालतात.
महिला - किराणा दुकान, भाजी बाजारापर्यंत पायी जातात.
पुरुष - रात्री जेवण झाल्यावर शतपावली करतात.
तरुणाई - गल्लीतल्या गल्लीत पायी फिरतात.
या कारणासाठी होतेय चालणे
आजचा काळ अतिशय गतिमान झालेला आहे. प्रत्येकाला आपले ध्येय पूर्ण करण्याचा ध्यास लागलेला आहे. अनेकांनी वाहनांचा वापर सुरू केला आहे. चालणे जवळपास बंदच झालेले आहे. स्वयंचलित वाहनांचा वापर वाढला. कार्यालयातही बसून काम केल्याने हाडांचे आजार वाढू लागले.
ज्यांना पायी चालणे शक्य नाही त्यांच्यासाठी
वयाची ६५ वर्षे ओलांडली की अनेकांना चालण्याचा त्रास होत असतो. ज्यांना पायी चालणे शक्य नाही, त्यांनी डाॅक्टरांच्या सल्ल्याने व्यायाम केला पाहिजे. हातापायाची हालचाल सारखी ठेवली पाहिजे. योगासने केल्यास त्याचाही फायदा होऊ शकतो.