लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे : वय वर्ष ७२ आणि एचआरसीटी स्कोर १७ असताना सेवानिवृत्त भगवान रामदास साळुंखे यांनी महापालिका संचलित अजमेरा डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटरमध्ये डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार सकारात्मतेने विचार करत प्रबळ इच्छाशक्तीच्या बळावर कोविडवर मात करण्यात यश मिळवले. ते आता सुखरुप घरी परतले आहेत.
शहरातील श्रमजीवी सोसायटीत राहणारे सेवानिवृत्त कर्मचारी भगवान रामदास साळुंखे (७२) यांना अचानक त्रास सुरु झाला. कोरोना चाचणी आणि एचआरसीटी तपासणी केली असता, १७ स्कोर आला. त्यात बी. पी. आणि डायबेटीसचा त्रास व आर्थिक परिस्थिती जेमतेम त्यामुळे खासगी रुग्णालयाचा खर्च न परवडणारा असल्याने जिल्हा रुग्णालयात तपासणी केली. तेथील वैद्यकीय सल्ल्यानुसार धुळे महानगरपालिका संचलित अजमेरा डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटरमध्ये दाखल करण्यात आले. याठिकाणी महापालिका आरोग्य अधिकारी डॉ. महेश मोरे, डाॅ. योगेश पाटील तसेच सेंटरमधील प्रमुख जे. सी. पाटील व डाॅ. सुरज पावरा यांच्या मार्गदर्शनाखाली भगवान साळुंखे यांच्यावर उपचार सुरु झाले. साळुंखे यांनीही उपचाराला सकारात्मक विचार करत उत्तम प्रतिसाद दिला. त्यामुळे ऑक्सिजन किंवा रेमडेसिविर इंजेक्शन न घेता, फक्त औषधोपचार व समुपदेशन यांच्या माध्यमातून धैर्याने या संकटाचा सामना करत अवघ्या १० दिवसात भगवान यांनी इच्छाशक्तीच्या बळावर कोरोनावर मात केली. यासाठी त्यांचा मुलगा मनीष साळुंखे, सून व आशा सेविका ज्योती साळुंखे, सामाजिक कार्यकर्ते, नगर सचिव मनोज वाघ, शिरीष जाधव, गोपाल पाटील यांचीही मोलाची साथ मिळाली.
कोविड हेल्थ सेंटरमधील मिळालेली वैद्यकीय सेवा तेथील सकारात्मक वातावरण तसेच सकस आहार, औषधोपचार हे उत्तम होते. त्यामुळेच मी कोरोनावर मात करु शकलो. यासाठी येथील वैद्यकीय अधिकारी तसेच आयुक्त अजीज शेख, अतिरिक्त आयुक्त गणेश गिरी यांचे मी मन:पूर्वक आभार मानतो, असे कोरोनावर मात करणारे कोरोना योद्धा भगवान साळुंखे यांनी सांगितले.