पिंपळनेर : साक्री तालुक्यात गेल्या आठवड्यात गुरुवारी सायंकाळी साडेचार वाजेच्या सुमारास अचानक आलेल्या जोरदार वादळी वाऱ्यासह गारपीट झाल्याने शेती पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. यासंदर्भात तालुक्याचे आमदार मंजुळा गावित यांनी प्रशासनाला शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याच्या सूचना केल्या. तालुक्यातील आमळी, मैदाणे परिसरात मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून त्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे काम महसूल विभागातर्फे सुरू आहेत. साक्रीच्या आमदार मंजुळा गावित यांनी तालुक्यातील नुकसानग्रस्त भागाचा दौरा केला. यावेळी अप्पर तहसीलदार विनायक ठेवेल व बीडीओ जे. टी. सूर्यवंशी आदी अधिकारी उपस्थित होते तसेच काॅंग्रेसचे तालुकाध्यक्ष भानुदास गांगुर्डे यांनीसुद्धा नुकसानीची पाहणी करून आमदार आणि अपर तहसीलदार विनायक थवील यांच्याकडे परिसरातील शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळवून द्यावी, अशी मागणी एका निवेदनाद्वारे केली. यावेळी आदिवासी बचाव आघाडीचे गणेश गावीत यांनी मैदाणे, चिंचपाडा, बोदगाव, साबरसोंडा, आमोडे, किरवाडे, कालदर स्थानिक शेतकरी उपस्थित होते. मैदाणे गणातील शेती पिकांना खूप मोठा फटका बसला असल्याची माहिती शेतकऱ्यानी दिली. यावेळी गणेश गावीत, सरपंच सुनील चौरे, ग्रामसेवक जितेंद्र बागुल, कृषी सहायक डी. एल.चौरे, तलाठी राऊत, सरपंच युवराज चौरे, पितांबर गवळी, भिला सूर्यवंशी, भरत ठाकरे आदी उपस्थित होते. तालुक्यात गहू व कांदा पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. मका पीक आडवे झाले आहे तर गारपिटीमुळे कांद्याचे मोठे नुकसान झाले आहे.
धनेर, आमळी, मैदांणे येथे गारपिटीमुळे माेठ्या प्रमाणावर नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2021 04:37 IST