ऑनलाइन प्रणालीद्वारे या सुविधेचा लाभ घेत ९ हजार ५२१ जणांनी ई-पाससाठी अर्ज केला होता. त्यापैकी ७ हजार ६७८ अर्ज नामंजूर करण्यात आले, अशी माहिती पोलीस सूत्रांनी दिली. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासन आणि स्थानिक प्रशासनाच्या माध्यमातून विविध उपाययोजना केल्या जात आहेत. त्याचाच एक भाग म्हणून एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात जाण्यासाठी ई-पासची सक्ती करण्यात आली आहे. त्याची जबाबदारी पोलीस विभागाकडे सोपविण्यात आलेली आहे. ऑनलाइन प्रणालीद्वारे अर्ज भरणे आवश्यक आहे. यात जाण्याचे कारण नमूद करताना प्रामुख्याने अंत्यविधी, वैद्यकीय कारणासह स्वत:चे लग्न या तीन कारणाशिवाय ई-पास वितरित केला जात नसल्याचे पोलीस सूत्रांकडून सांगण्यात आले.
जिल्ह्याबाहेर जाण्यासाठी काहीही
- ई-पाससाठी ९ हजार ५२१ जणांनी अर्ज सादर केले होते. त्यापैकी केवळ १ हजार ८४३ जणांचे ई-पास मंजूर करण्यात आले. ७ हजार ६७८ जणांचे ई-पास नामंजूर करण्यात आले असून त्याचे प्रमाण १९.४ टक्के इतके आहे.
- ज्यांनी आपल्या अर्जात फिरायला जाणे, नातेवाइकांना अथवा मुलांना आणायचे आहे, असे शासन नियमाव्यतिरिक्त विचित्र कारण नमूद केल्यामुळे त्यांचे अर्ज नामंजूर झाले आहेत.
- तसेच जिल्ह्यात ८ ठिकाणी आंतरराज्य आणि १९ ठिकाणी आंतरजिल्हा तपासणी नाके आहेत.
- या ठिकाणी पोहोचल्यावर ई-पासची विचारणा केली जाते. आपल्याकडे ई-पास नसल्यास संबंधितांना पुन्हा परत पाठविले जात आहे. परिणामी, कोणावरही कारवाई करण्यात आलेली नाही, असे सांगण्यात आले.
सर्वांचीच मेडिकल इमर्जन्सी कशी?
जिल्ह्याबाहेर जाण्यासाठी अनेकांकडून खोटी कारणे सांगण्यात येतात. अर्जात देखील तशी कारणे सांगून मेडिकल इमर्जन्सी असल्याचे नमूद करतात. सर्वांनाच एकाच वेळेस मेडिकल समस्या कशी येऊ शकते, असा साधा प्रश्न पोलिसांपुढे निर्माण झालेला आहे. त्याचेही निराकरण करण्याचा प्रयत्न केला जात आहे.