खरीप हंगाम २०२१ यशस्वी करण्यासाठी व आधुनिक कृषी तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी राज्यातील कृषी विभागाचे अधिकारी, कर्मचारी, कृषी विभाग जिल्हा परिषद, कृषी विद्यापीठ, कृषी विज्ञान केंद्राचे शास्त्रज्ञ, कृषिमित्र हे शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणार आहेत, अशी माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विवेक सोनवणे यांनी दिली.
खरीप पिकांचा पेरणी आणि जमीन मशागतीचा कालावधी सुरू झाला आहे. कृषी संजीवनी मोहिमेंतर्गत २१ जून रोजी बीबीएफ लागवड, २२ रोजी बीजप्रक्रिया, २३ रोजी जमीन आरोग्यपत्रिकेनुसार खतांचा संतुलित वापर, २४ रोजी कापूस एक गाव, एक वाण,२५ रोजी विकेल ते पिकेल, २८ रोजी महात्मा गांधी रोजगार हमी योजनेंतर्गत फळबाग लागवड व तंत्रज्ञान प्रसार, २९ रोजी तालुक्यातील दोन पिकांत उत्पादकतावाढीसाठी रिसोर्स बॅंकेतील शेतकऱ्यांचा सहभाग, ३० रोजी तालुक्यातील महत्त्वाच्या पिकांची कीड व रोग नियंत्रणाच्या उपाययोजना यावर मार्गदर्शन केले जाणार आहे, तर १ जुलै रोजी कृषी दिन साजरा करून मोहिमेचा समारोप होईल. शेतकऱ्यांनी या मोहिमेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी तथा प्रकल्प संचालक (आत्मा) सोनवणे यांनी केले आहे.