धुळे - जिल्ह्यातील कोरोनाची दुसरी लाट जून महिन्यात उतरंडीला लागली आहे. गेल्या २० दिवसात आढळलेल्या बाधित रुग्णांपेक्षा कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या अधिक आहे. तसेच केवळ तीन रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मात्र निर्बंध शिथिल झाल्यानंतर ठिकठिकाणी होत असलेली गर्दी तिसऱ्या लाटेला निमंत्रण तर देणार नाही ना ? अशी भीती व्यक्त केली जात आहे.
कोरोना प्रादुर्भाव नियंत्रणात येण्याच्या बाबतीत मे महिना आतापर्यंत तरी दिलासादायक ठरला आहे. १ ते २० जून या कालावधीत जिल्ह्यात २९३ कोरोना बाधित रुग्ण आढळले आहेत. बाधित रुग्णांपेक्षा बरे झालेल्या रुग्णांची संख्या मात्र अधिक आहे. गेल्या २० दिवसात ९३७ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तर तीन रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मार्च व एप्रिल महिन्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने हाहाकार माजवला होता. मात्र १५ मे नंतर बाधित रुग्णांची संख्या कमी होण्यास सुरुवात झाली होती. जून महिन्यात तर लाट पूर्णपणे उतरंडीला लागली आहे.
३१ मे रोजी होते ६४७ सक्रिय रुग्ण -
३१ मे रोजी ६४७ सक्रिय रुग्ण होते. १ ते २० जून या कालावधीत दैनंदिन बाधित रुग्णांची संख्या घसरल्याने सक्रिय रुग्णांची संख्याही कमी झाली आहे. सध्या केवळ ९९ सक्रिय रुग्ण आहेत. तसेच ३१ मे पर्यंत जिल्ह्यातील एकूण मृतांची संख्या ६६५ इतकी होती. मागील २० दिवसात तीन रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
अनलॉकच्या पहिल्या टप्प्यात स्थान कायम -
निर्बंध शिथिल करण्यासाठी राज्य शासनाने पाच टप्पे केले आहेत. प्रत्येक आठवड्यात त्याचा आढावा घेण्याच्या सूचना जिल्हा प्रशासनाला केल्या आहेत. कोरोनाची स्थिती लक्षात घेऊन निर्बंध कठोर किंवा शिथिल करण्याच्या सूचना आहे. पॉझिटिव्हिटी पाच टक्क्यांपेक्षा कमी व ऑक्सिजन बेड २५ टक्क्यांपेक्षा कमी व्यापलेल्या जिल्ह्यांचा समावेश पहिल्या टप्प्यात करण्यात आला आहे. पहिल्या टप्प्यात असलेल्या जिल्ह्याना नियमांमध्ये सर्वाधिक शिथिलता मिळाली आहे. अनलॉक नंतरही धुळ्याचा पॉझिटिव्हिटी रेट १ टक्क्यांपर्यंत कमी झाल्याने अनलॉक शिथिलतेच्या नियमांमध्ये पहिल्या टप्प्यावर स्थान कायम आहे.
वाढत्या गर्दीचे करायचे काय ?
निर्बंध शिथिल झाल्यानंतर बाजारपेठेत व इतर ठिकाणीही गर्दी वाढली आहे. मास्कचा तर नागरिकांना विसरच पडला असून सोशल डिस्टंसिंगचा पुरता फज्जा उडाला आहे. त्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा वाढणार तर नाही ना अशी भीती व्यक्त केली जात आहे. प्रादुर्भाव कमी झाला असली तरी कोरोना विषाणूचा संसर्ग अजून पूर्णपणे थांबलेला नाही त्यामुळे नागरिकांनी कोरोना प्रतिबंधक नियमांचे पालन करणे आवश्यक असल्याचे मत जिल्हा नोडल अधिकारी डॉ. विशाल पाटील यांनी व्यक्त केले आहे.
ग्राफ साठी -
जूनमध्ये कोरोनाचा ग्राफ घसरला
१ ते २० जून
पॉझिटिव्ह रुग्ण - २९३
बरे झालेले - ९३७
मृत्यू - ३
सक्रिय रुग्ण - ९९