वडजाई : येथील येथील ग्रामदैवत वडजाई देवी यात्रा उत्सवास १२ तारखेपासून प्रारंभ होत आहे. या पार्श्वभूमीवर जय्यत तयारी सुरु आहे. या दोन दिवस चालणाºया यात्रोत्सवादरम्यान विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.वडजाई येथील ग्रामदैवत व खान्देशातील चार कुळाची कुलदैवत असलेल्या वडजाई माता यात्रा उत्सवादरम्यान नवस फेडण्यासाठी व दर्शनासाठी भाविकांची मोठ्या संख्येने गर्दी होते. या पार्श्वभुमीवर मंदिराला रंगरंगोटी करण्यात आली असून परिसराची साफसफाई करण्यात आली आहे. पुजेचे साहित्य, रसवंती, शीतपेय खाद्यपदार्थ, मनोरंजनासाठी पाळणे, खेळणे, संसारोपयोगी साहित्यासह विविध व्यावसायिकांनी दुकाने थाटण्यास सुरुवात केली आहे. १२ रोजी सायंकाळी ढोल ताशा, लेझीम, बॅन्ड अशा वाद्यांच्या गजरात देवीला गावाच्या वतीने आहेर देण्यात येणार आहे. तसेच तगतरावाची मिरवणुक काढण्यात येणार आहे. तगतराव मिरवणुकीसाठी गावातील ज्येष्ठ नागरिकांच्या बैलजोडीला मान देण्यात येतो. रात्री सोपान कोळी यांचा लोकनाट्याचा कार्यक्रम होईल. तर १३ रोजी मास्टर रतन भाऊ व सोमनाथ नगरदेवळेकर यांच्या लोकनाटयाचा कार्यक्रम होणार आहे. तसेच १३ रोजी यात्रोत्सवाचे आकर्षण असलेली कुस्त्यांची दंगल होणार आहे. या दंगलीत परिसरासह बाहेरगावचे मल्ल सहभागी होतात व विजयी मल्लांना भांडे व रोख स्वरूपात बक्षीस दिले जाते.
बारागाड्यांची परंपरा
वडजाई येथे गेल्या ६० वर्षांपासून ग्रामदैवत वडजाई माता यात्रोत्सवानिमित्त बारागाडे ओढण्याची परंपरा अखंडीत सुरू आहे. गाडे ओढण्यासाठी गावाच्या सर्वानुमते भगत म्हणून गावातील महेश चिंधू सुर्यवंशी यांची निवड करण्यात आली आहे. ते सध्या मुंबई पोलीस दलात कार्यरत आहेत.