साक्री तालुक्यात जिल्हा परिषदेचे कासारे, म्हसदी, कळंभीर, दुसाणे, जैताणे, छडवेल, नवापाडा, दहिवेल, शिरसोला, रोहोड, टेंबा, कुडाशी, सुकापूर आणि बसरावळ असे एकूण १४ प्राथमिक आरोग्य केंद्र व त्यांच्या अंतर्गत असलेले ८६ आरोग्य उपकेंद्र तसेच साक्री, पिंपळनेर, जैताणे येथील ग्रामीण रुग्णालये यांच्या माध्यमातून आरोग्य सेवेचा लाभ दिला जात आहे. साक्री तालुका हा आदिवासी वस्ती असलेला मोठा तालुका आहे. आदिवासी बांधव अशिक्षित असल्याने कोविड १९ ची लस टोचून घेण्यास तयार होत नव्हते. साक्री तालुक्याच्या आमदार मंजुळा गावित आणि माजी जिल्हा परिषद सदस्य डॉ. तुळशीराम गावित यांच्या मार्गदर्शनाने जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, ग्रामसेवक, तलाठी, आरोग्य आणि अंगणवाडी कर्मचारी, सरपंच तसेच ग्रामपंचायत सदस्य व सामाजिक कार्यकर्ते यांनी एकत्रितपणे गावोगावी जाऊन आदिवासी बोलीभाषेत कोरोना लसीकरण सुरक्षित असून, लस टोचून घेण्याचे महत्त्व समजावून सांगितले. त्यासाठी शासनाच्या आदेशानुसार आरोग्य व अंगणवाडी कर्मचारी, शिक्षक, तलाठी, ग्रामसेवक यांच्या समित्या स्थापन केल्या व मार्गदर्शन केले. या लसीकरणाच्या कार्यक्रमास आदिवासी बांधवांनी सकारात्मक प्रतिसाद देण्यास सुरुवात केली आहे व लसीकरणासाठी लसीकरण केंद्रावर गर्दी सुरू झाली आहे.
साक्री तालुक्यात दर तीन दिवसाआड कोविड १९ व्हॅक्सिनचे चार हजार डोस उपलब्ध करून दिले जातात. १ मे पासून १८ वर्षांवरील सर्वच नागरिकांना लस देण्याची मोहीम सुरू झाली आहे. त्यामुळे साक्री तालुका क्षेत्रात लसीकरणाची मोहीम अधिक प्रमाणात राबविण्यासाठी दररोज पाच हजार डोस उपलब्ध करून द्यावे किंवा दर तीन दिवसांसाठी १२ हजार डोस उपलब्ध करून द्यावेत, अशी मागणी आमदार गावित यांनी साडेतीन लक्ष मतदार बंधू-भगिनींसाठी धुळे जिल्हयाचे पालकमंत्री अब्दुल सत्तार तसेच धुळ्याचे जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी व स्थानिक प्रशासनाकडे केली आहे.