कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव राष्ट्रीय सेवा योजना विभाग, युवक बिरादरी, भारत व झेड.बी. पाटील महाविद्यालय, धुळे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ऑनलाइन व्याख्यानात डाॅ. गिरासे बोलत होते. अध्यक्षस्थानी पद्मश्री क्रांती शहा होते.
तर प्रमुख अतिथी म्हणून जळगाव रासेयो संचालक डॉ. पंकजकुमार नन्नवरे, झेड.बी. पाटील महाविद्यालय, विकास समिती चेअरमन प्रा. सुधीर पाटील, प्राचार्य डॉ. पी.एच. पवार, माजी उपप्राचार्या डॉ. शशिकला पवार, डॉ. सचिन नांद्रे, उपप्राचार्य प्रा. व्ही.एस. पवार, डॉ. डी.के. पाटील व डॉ. वर्षा पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
डॉ. गिरासे पुढे म्हणाले, नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी आझाद हिंद सेनेची स्थापना केली आणि या सर्वांच्या बरोबरीने भगत सिंह, सुखदेव, राजगुरू, चंद्रशेखर आझाद, चाफेकर बंधू अशा असंख्य क्रांतिवीरांनी देशाला स्वतंत्र करण्यासाठी आपल्या प्राणांची आहुती दिली. १८५७ पासून १९४७ या कालखंडात स्वातंत्र्यलढ्यात अनेक चढ-उतार आले, अनेक क्रांतिवीरांनी बलिदान केले, नवनवीन नेतृत्व आले. परंतु १९४२ ते १९४७ पर्यंतचा कालखंड अधिक वेगवान होता. वर्तमान स्थितीत स्वातंत्र्य संग्रामातील राष्ट्रपुरुषांच्या त्यागाच्या व बलिदानाच्या इतिहासाची उजळणी युवक तसेच समाजासमोर होणे गरजेचे आहे, असे त्यांनी सांगितले.
पद्मश्री क्रांती शहा म्हणाले की, महात्मा गांधीजींनी ‘छोडो भारत’ जनआंदोलनाद्वारे आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले. पण आज देशात वाढलेला भ्रष्टाचार व बेरोजगारी कमी करून स्वातंत्र्याचे रूपांतर सुराज्यात होण्यासाठी छोडो गरिबी, छोडो दारिद्रय, छोडो निराशा नारा देण्याची आवश्यकता आहे.
प्राचार्य डॉ. पी.एच. पवार सर यांनी अतिथीपर मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक डॉ. पंकजकुमार नन्नवरे यांनी केले. सूत्रसंचालन रासेयो कार्यक्रम अधिकारी डॉ. प्रशांत कसबे यांनी केले, तर डॉ. योगिता पाटील यांनी आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी प्रा. प्रतीक शिंदे व रासेयो स्वयंसेवक अभिजित घुगे, गौतमी पवार, महेश भामरे, प्रवीण पाटील यांनी परिश्रम घेतले.