वर्षातला एक महिना असा गेला नसेल की चोरटी वाळू वाहतूक करणारे डंपर पकडले गेले नसतील. दरवर्षी वाळू ठेक्यातून शासनाला कोट्यवधीचा महसूल मिळतो. पण त्यापेक्षाही जास्त दुप्पटची आर्थिक उलाढाल ही वाळू तस्करीच्या धंद्यातून होते, हे कोणीही सांगेल. त्यामुळेच या धंद्यात आता मोठमोठे धनदांडगे उतरले आहेत. तर काही याच धंद्यावर धनदांडगे झाले आहेत. या धंद्यातून महसूल विभागातील अधिकाऱ्यांनाही चांगला मलिदा मिळतो. त्यामुळेच ठेके बंद असतानाही सर्रासपणे सुरू असलेली वाळूची तस्करी या अधिकाऱ्यांना दिसत नाही. अनेकदा स्थानिक ग्रामस्थच वाळू तस्करी करणाऱ्यांना पकडून अधिकारी व पोलिसांच्या ताब्यात देतात. त्यानंतर त्यांच्यावर दंडात्मक कारवाई केली जाते. आधी हा दंड खूप कमी होतो. परंतु आता दंडाची रक्कम खूप वाढविली असली तरी महिना, दोन महिन्यांतून वाहन पकडवून ती दंडाची रक्कम भरणेसुद्धा या वाळूमाफियांना परवडते, असेच म्हणावे लागेल. कारण मोठ्या प्रमाणावर दंड आकारणी झाल्यानंतर वाळू तस्करी थांबायला हवी होती. परंतु ती आणखी वाढली आहे.
वाळू तस्करी रात्रीच मोठ्या प्रमाणावर होते. दररोज रात्रीतून वाळूने भरलेले डंपर हे धुळे, साक्री, पिंपळनेर मार्गे नाशिक आणि मुंबईकडे भरधाव वेगाने रवाना होतात. रात्री सुसाट वेगाने एकामागून एक असे वाळूने भरलेले वाहन एका रांगेत निघतात. हे वाहन ‘ओव्हरलोड’ ओल्या वाळूने भरलेले असते. वाळूवर फक्त वरती एक प्लॅस्टिकचे कापड टाकलेले असते. भरधाव वेगामुळे अनेकदा वाळूचे बारीक कण हवेत उडून मागे येणाऱ्या वाहनचालकाच्या डोळ्यात जातात. त्यामुळे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने महामार्गावर अपघातही झालेले आहेत.
वाळूचे ठेके जरी दुसऱ्याच्या नावावर घेतले गेलेले असले तरी त्याचा बोलविता धनी मात्र समाजातील प्रतिष्ठित समजला जाणारा ‘गब्बर’ माणूस असतो. तो सर्व ‘मॅनेज’ करतो. वाळू उपशासाठी सर्व नियम धाब्यावर बसवून मोटारबोटीचा, क्रेनचा वापर सर्रासपणे केला जातो. यामुळे तापी, पांझरा आणि बुराई नदीच्या पात्रात मोठमोठे खड्डे पडले आहेत. पाणी भरल्यामुळे हे खड्डे न दिसल्यामुळे त्यात बुडून शिंदखेडा आणि साक्री तालुक्यातील काही तरुणांचे बळीही गेलेले आहे. वाळूच्या धंद्यात अमाप म्हणण्यापेक्षा रग्गड कमाई आहे. वाळू तस्करीच्या धंद्यात एक मोठी बिल्डर लॉबी तयार झाली आहे. तिची पाळेमुळे इतक्या खोलपर्यंत गेली आहे की, आता या अवैध वाळू धंद्यात अनेकांचे हात ओले झाले आहेत. त्यामुळे हा धंदा बंद करण्याची ताकद एकाही महसूल अधिकाऱ्यामध्ये नाही, असे हे स्वत: वाळू तस्कर छातीठोकपणे सांगतात. वाळू तस्करांची मुजोरी बंद करण्यासाठी आवश्यक ती पावले उचलली गेली पाहिजेत. अन्यथा शिंदखेडा तालुक्यातील मुडावद येथे घडलेल्या घटनेसारखे उद्रेक अन्य ठिकाणीही होतील आणि त्यातून जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था धोक्यात येण्याचीही भीती आहे.