नरडाणा : शिंदखेडा तालुक्यातील नरडाणा येथे गेल्या दहा दिवसांपासून नळाला पाणी आलेले नाही. यामुळे संतप्त ग्रामस्थांनी बुधवारी ग्रामपंचायतीवर मोर्चा काढला. मात्र, ग्रामपंचायतीला कुलूप असल्याने ग्रामस्थांनी दरवाज्यावर निवेदन चिटकवले.नरडाणा येथे तीव्र पाणीटंचाई भेडसावत आहे. यामुळे नागरिकांना पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागत आहे. त्यात गेल्या दहा दिवसांपासून नळाला पाणीच न आल्याने ग्रामस्थांच्या समस्येत भर पडली. यामुळे संतप्त ग्रामस्थांनी ग्रामपंचायत सदस्य निखिल सिसोदे यांच्या नेतृत्वाखाली बुधवारी ग्रामपंचायत कार्यालयावर मोर्चा काढला. मोर्चा ग्रामपंचायतीवर पोहोचला. मात्र, ग्रामपंचायतीमध्ये सरपंच, ग्रामसेवकासह एकही कर्मचारी हजर नव्हता.ग्रामपंचायतीला कुलूप लागलेले होते. यामुळे ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला. मोर्चेकऱ्यांनी आपले निवेदन ग्रामपंचायतीच्या दरवाज्यावर चिटकवले.मोर्चात शिवसेनेचे विजय भीमराव सिसोदे, पोलीस पाटील जिजाबराव सिसोदे, छोटू सिसोदे, विनोद पाटील, विशाल शिसोदे, राजेश सिसोदे, सतीश सिसोदे, सुनील महाले, अजय सिसोदे, दत्तू पाटील, वैशाली महाले, कल्पना कोळी, नईम खाटीक आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.तापी योजना पूर्णत्वाकडेनरडाणा गावाला पाणीपुरवठा करण्यासाठी तापी पाणीपुरवठा योजना पूर्णत्वाकडे असून काही तांत्रिक अडचणीमुळे ही योजना लांबणीवर पडली होती. दोन दिवसापूर्वीच या योजनेची चाचणी घेण्यात आली व तापीचे पाणी नरडाणा येथील जलशुद्धीकरण केंद्रासह टाकीत टाकण्यात आले. या योजनेची जोडणी अंतिम टप्प्यात असून अवघ्या काही दिवसात ही योजना सुरू होईल. दभाशी ते वर्षी मुख्यमंत्री पेयजल योजनाअंतर्गत या योजनेला निधी मिळाला. वर्षी येथे जलशुद्धीकरणगृहाची दुरुस्ती करण्यात आली. नंतर वर्षी ते नरडाणा टंचाई योजनेअंतर्गत या योजनेला निधी प्राप्त झाला. जुनी पाईपलाईन जीर्ण झाल्याने खासदार सुभाष भामरे यांच्याकडून निधी मिळाला, असा एकूण अंदाजीत एक कोटीच्या जवळपास निधी या योजनेला प्राप्त झाला व ही योजना अंतिम टप्प्यात आहे. या योजनेचे पाणी गावातील पाण्याच्या टाकीपर्यंत पोहोचले असून त्याची चाचपणी पूर्ण झाली आहे.
ग्रामस्थांचा ग्रामपंचायतीवर मोर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2019 22:51 IST