फटाके फोडत बुलेट चालविणाऱ्यांना पकडून त्यांच्यावर कारवाई करण्याची मोहिम शहर वाहतूक शाखेने राबविण्यास अचानक सुरुवात केली. सहायक पोलीस निरीक्षक संगिता राऊत यांच्या नेतृत्वाखाली पथकाने पारोळा रोडवरील गिंदोडीया चौक गुरुवारी दुपारी गाठला. सामान्य वाहनचालक, नागरीकांना त्रास होईल अशा प्रकारे सायलेन्सरमध्ये बदल करुन मोठा आवाज करणाऱ्या बुलेट मोटारसायकलस्वारांना पथकाने पकडले. त्यांच्या बुलेट तपासले असता त्यात बदल केल्याचे लक्षात येताच अशा ८ बुलेट पोलिसांनी जप्त करुन शहर वाहतूक शाखेत आणल्या. त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात आली आणि बुलेटमध्ये केलेला बदल काढून घेण्याच्या सुचनाही यावेळी देण्यात आल्या. ही कारवाई सायंकाळी उशिरापर्यंत सुरु होती.
पोलीस अधीक्षक चिन्मय पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली शहर वाहतूक शाखेच्या सहायक पोलीस निरीक्षक संगिता राऊत यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक आर. डी. जाधव, कर्मचारी डी. झेड. पाटील, आरीफ शेख, जितेंद्र आखाडे, मनोहर महाले, सुनील कुलकर्णी, मतीन शेख, मिलींद कुलकर्णी आणि त्यांच्या सोबत क्यूआरटी पथक यांनी ही कारवाई केली. दरम्यान, कारवाईची ही मोहीम अव्यायतपणे सुरु राहणार असल्याचे सांगण्यात आले.