सन २०२० हे वर्ष कोरोनाच्या संकटाने ग्रासले. लाॅकडाऊन असला तरी खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना शेतीकामे करण्यास मुभा होती. पीक कर्ज घेऊन शेतकऱ्यांनी शेती केली. परंतु ऐन पिके काढणीच्या वेळेस अतिवृष्टी झाली आणि हाताशी आलेले पीक गेले, धान्य सडले. शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. शासनाने कापूस पिकासह धान्याला हमीभाव दिला असला तरी केवळ दर्जेदार धान्य खरेदीची अट असल्याने शासनाचा हमीभाव शेतकऱ्यांच्या नशिबी आला नाही. खरीप हंगाम हातातून गेला असला तरी रब्बी हंगामात त्याची भरपाई निघेल या आशेवर शेतकरी होता. परंतु रब्बी हंगामात देखील अस्मानी संकट कोसळले. केवळ पंधरा दिवसात पिके हाताशी येणार होती. परंतु पुन्हा वादळी पावसाने हाहाकार माजवला. पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्यामुळे शेतकरी पुन्हा एकदा संकटात सापडला आहे. कर्जबाजारी झाला आहे. पीककर्ज फेडावे तरी कसे, असा प्रश्न त्यांना पडला आहे. या आधी झालेल्या नुकसानीची शेतकऱ्यांना अजूनही मदतीची प्रतीक्षा आहे. अशात अजून एकदा राज्याला आणि जिल्ह्याला अवकाळी पावसाने अक्षरशः झोडपून काढल्याने शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे. अशातच राज्यासह जिल्ह्यात देखील कोरोनाचा संसर्ग वाढतो आहे. रुग्णसंख्येने गेल्या वर्षाप्रमाणे उच्चांक गाठायला सुरुवात केली आहे. राज्य शासनाने लाॅकडाऊनचे संकेत दिले आहेत. कोरोनाचा हाहाकार पुन्हा माजला आणि लाॅकडाऊन झाले तर प्रतिबंधात्मक उपाययोजना, स्थलांतरित मजुरांची सोय, बेरोजगार आणि गरीबांच्या अन्नाची व्यवस्था करण्यात प्रशासन अडकून पडले. त्यामुळे नुकसान झालेल्या पिकांचे युध्द पातळीवर पंचनामे करून त्वरित नुकसान भरपाई देण्याचे नियोजन शासन, प्रशासनाने करण्याची गरज आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसह जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी त्वरित पंचनामे करण्याची मागणी लावून धरली आहे. शिरपूरचे आमदार काशिराम पावरा यांनी प्रशासनाला नुकतेच निवेदन दिले. प्रशासनाने काही ठिकाणी पंचनामे करण्याचे काम सुरू केले असले तरी या मोहिमेला व्यापक गती देण्याची गरज व्यक्त होत आहे. अवकाळी पावसाचा फटका बसलेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी सद्या पंचनाम्याचे काम पूर्ण होईपर्यंत मागील नुकसान भरपाईची रक्कम शेतकऱ्यांना अदा करणेदेखील तितकेच गरजेचे आहे.
अस्मानी संकटाने शेतकरी बेजार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2021 04:54 IST