निवडणुका असोत की धार्मिक कार्यक्रम, रॅली असो वा अन्य कोणताही कार्यक्रम ज्याठिकाणी पोलिसांची आवश्यकता असते त्याठिकाणी होमगार्ड पुरुष असो की महिला यांनादेखील बंदोबस्तासाठी तैनात राहावे लागते. जेवढे बंदोबस्ताचे दिवस असतात तेवढेच त्यांना मानधन वितरित केले जाते. बंदोबस्त कायम नसला तरी त्यांना मिळणारे तुटपुंजे मानधन किमान नियमित मिळायला हवे, अशी माफक अपेक्षा होमगार्ड बांधवांची आहे. गेल्या दोन ते तीन महिने झाले त्यांना किमान नियमित मिळणारे मानधनदेखील मिळालेले नाही. एवढेच नव्हे तर विधानसभा निवडणूक होऊन बराच काळ लोटला असला तरी त्यावेळी केलेल्या बंदोबस्ताचे मानधनदेखील मिळालेले नाही.
महिन्याला किती मिळते काम?
होमगार्ड बांधव असो किंवा भगिनी या सर्वांना दर महिन्याला काम मिळतेच असे नाही. आवश्यकतेनुसार त्यांची मदत पोलीस प्रशासनाकडून घेतली जात असते, तसेच ज्यादिवशी ज्या होमगार्डची मदत घेतली जाते त्या दिवसांचे मानधन त्यांच्या खात्यावर जमा होणे अपेक्षित आहे; पण नेमके तेच होत नसल्याचे समोर येत आहे.