धुळे : माझ्याकडे मोबाइल नाही, एक कॉल करायचा आहे, अशी बतावणी करून कॉल करत आपल्या मोबाइल नंबरचा कोणीही दुरुपयोग करू शकतो. असे करून संबंधित व्यक्ती आपले बँक खाते साफ करू शकते. त्यामुळे आपला मोबाइल कोणाला देणे चांगलेच महागात पडू शकते. त्यामुळे काळजी घेण्याची गरज निर्माण झाली आहे. आपला दैनंदिन वापरातील मोबाइल नंबर हा बँक खात्याशी जोडलेला असतो. काही जण आपल्या मोबाइलवरून ऑनलाइन व्यवहार करीत असतात. समोरची व्यक्ती कोणत्या उद्देशाने आपल्याकडून मोबाइल घेऊन कॉल करेल हे सांगू शकत नाही. ऑनलाइन व्यवहाराच्या माध्यमातून आपल्या बँक खात्याशी जोडलेल्या मोबाइल नंबरचा कोणीही गैरफायदा घेऊ शकतो. त्यामुळे अनोळखी व्यक्तीकडे आपला मोबाइल काॅल करण्यासाठी देणे चांगलेच महागात पडू शकते.
ओटीपी मिळविण्यासाठी अशी केली जाऊ शकते फसवणूक
- कॉल करण्यासाठी मोबाइल घेऊन
कॉल करायचा आहे, असे सांगून आपल्या मोबाइलचा दुरुपयोग केला जाऊ शकतो. मोबाइल नंबरचा गैरफायदा घेतला जाऊ शकतो.
- वेगळी लिंक पाठवून
मोबाइल नंबरद्वारे फोन करून आपल्याच माेबाइलवर लिंक येऊ शकते. तिला ओपन केल्यानंतर आपली फसगत होऊ शकते.
- लॉटरी लागली आहे असे सांगून
आपल्याला लॉटरी लागली आहे, असे सांगून आपला बँक खात्याची माहिती घेऊन त्याद्वारे बँक खाते साफ होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
- केवायसीसाठी आवश्यक असे सांगून
आपल्याला मोबाइलवर फोन करून केवायसीसाठी आवश्यक असल्याची बतावणी करून आपल्या बँक खात्याची माहिती घेत दुरुपयोग केला जाऊ शकतो.
ही घ्या काळजी-
- माणुसकीचे दर्शन दाखवून कोणत्याही अनोळखी व्यक्तीला आपला मोबाइल देऊ नये. फोन लावायचा आहे, अशी बतावणी त्यांच्याकडून केली जाऊ शकते. त्यातून आपली फसगत करून बँक खाते साफ केले जाऊ शकते.
- कोणत्याही आणि माहिती नसलेल्या लिंकला क्लिक करून माहिती भरणे टाळायला हवे. त्यातून आपली हमखास फसगत होऊन आपले पैसे परस्पर वर्ग होऊ शकतात.
- अनोळखी व्यक्तीच्या कोणत्याही आमिषाला कधीही बळी पडू नका. गोड बाेलून आपली माहिती विचारून आपली फसगत होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
- अनोळखी व्यक्तीने कॉल करण्यासाठी फोन मागितल्यास त्यांना फाेन देणे टाळायला हवे. ऑनलाइन व्यवहाराच्या माध्यमातून होणाऱ्या व्यवहाराचा ओटीपी नंबर अनोळखी व्यक्तीला देऊ नये. आपली कोणत्याही प्रकारची फसगत होणार नाही यासाठी प्रत्येकाने काळजी घ्यावी.
- सतीश गोराडे, पोलीस निरीक्षक, सायबर सेल, धुळे.