धुळे - ग्रामपंचायत निवडणुकीसाठी आता अवघे चारच दिवस बाकी असल्याने उमेदवार व त्यांचे समर्थक जिवाचे रान करून प्रचार करत आहेत. सकाळी उठल्यापासून त्यांचे मतदारांना हात जोडणे सुरू होते. दुपारी थोडा विसावा घेतला की, सायंकाळी पुन्हा तोच कार्यक्रम सुरु असतो. त्यामुळे अनेक समर्थक थकले आहेत. मात्र, भाऊंना निवडून आणायचा समर्थकांनी चंग बांधलेला आहे. अशाच एका गावात प्रचार केल्यानंतर उमेदवार व त्याचे समर्थक चर्चा करत होते. समोरचा उमेदवारही तगडा असल्याने, भाऊंना थाेडी धाकधूकच आहे. त्यामुळे त्यांनी समर्थकांना ‘गाफील राहू नका... रात्र वैऱ्याची आहे...’ असा मंत्र दिला. भाऊंच्या चेहऱ्यावरचे हावभाव बघून समर्थकही थोडे चिंताग्रस्तच झाले. काहीही करायचे अन् भाऊंना विजयी करायचे, अशी कुजबूज त्यांच्यात सुरू झाली.
यात्रा नसतानाही गावात यात्रा...
जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये दरवर्षी यात्रा भरतात. या यात्रोत्सवाला बाहेरगावी गेलेले गावातील ग्रामस्थही आवर्जून उपस्थित राहतात. बाहेरगावी गेलेले गावात आल्याने, गावातील गल्लीबोळांमध्येही चांगलीच गजबज असते. मात्र, यावर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाने सर्वच यात्रोत्सवांवर बंदी घातलेली आहे. यात्राच नसल्यामुळे नोकरीनिमित्त बाहेरगावी गेलेलेही यावेळी गावाकडे फिरकलेले नाहीत. मात्र, ग्रामपंचायत निवडणुकीमुळे उमेदवार व त्यांचे समर्थक एकत्र येत असल्याने, गावातील विविध प्रभागांना यात्रेचे स्वरूप आलेले आहे. यात्रा नाही मात्र यात्रेसारखीच गर्दी सर्वत्र दिसते. गावातील हाॅटेलमध्ये रामभाऊ व शामभाऊ चहा पीत असताना ‘गावमा यात्रा नही मात्र गर्दी मातर यात्रांजोगी शे...’ असे म्हणताच उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला होता.