धुळे : दारू पिण्यासाठी पैसे दिले नाहीत म्हणून दोघा चुलत दिरांनी कुऱ्हाडीने वार करून भावजईचा खून केल्याची घटना साक्री तालुक्यातील छावडी गावात घडली. दोन्ही संशयित फरार असून, पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. शकुंतला ओंकार पिंपळे (६५, रा. छावडी) या महिलेचा खून झाला आहे. दारू पिण्यासाठी पैसे दिले नाहीत याचा राग आल्याने भास्कर निंबा पिंपळे याने शकुंतलाबाईच्या डोक्यात कुऱ्हाडीने वार केला. तसेच अंकित भास्कर पिंपळे यांनी शिवीगाळ करीत जिवे मारण्याची धमकी दिली. ११ ऑगस्ट रोजी सकाळी १०.३० वाजेच्या सुमाराला घडलेल्या या घटनेत शकुंतलाबाई गंभीर जखमी झाली होती. तिच्यावर धुळे येथे भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या सर्वोपचार रुग्णालयात उपचार सुरू होते. या प्रकरणी शकुंतलाबाईंचा मुलगा किसन ओंकार पिंपळे (४५, रा. छावडी) याने दिलेल्या फिर्यादीवरून भास्कर आणि अंकित पिंपळे यांच्याविरुद्ध निजामपूर पोलीस ठाण्यात १३ ऑगस्ट रोजी भादंवि कलम ३०७, ५०४, ५०६, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान, उपचार सुरू असताना १७ ऑगस्ट रोजी शकुंतलाबाईंचा मृत्यू झाला. शवविच्छेदन अहवाल प्राप्त झाल्यानंतर पोलिसांनी या गुन्ह्यात खुनाचे ३०२ हे वाढीव कलम लावले. गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक एस. एच. वसावे करीत आहेत.
दोघे संशयित फरार; शोधासाठी पथक
या घटनेनंतर भास्कर आणि अंकित पिंपळे हे दोघे संशयित फरार झाले आहेत. पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. फोनद्वारे तसेच नातेवाईक, मित्रांना प्रत्यक्ष भेटून माहिती घेतली जात आहे. संशयितांच्या शोधासाठी पथक रवाना केले आहे, अशी माहिती पोलीस उपनिरीक्षक वसावे यांनी दिली.