धुळे : कोरोनाचा संसर्ग सुरू झाल्यापासून गेल्या वर्षभरात शववाहिका चालकांचा एकप्रकारे मृत्यूसोबतच प्रवास सुरू आहे. असे असले तरी त्यांनी रुग्णसेवेत कधीही खंड पडू दिला नाही.
जिल्ह्यातील अतिगंभीर रुग्णांवर हिरे वैद्यकीय महाविद्यालयात उपचार होतात. दररोज सरासरी पाच मृत्यू होत आहेत. जिल्हा रुग्णालय तसेच जिल्ह्यातील इतर कोरोना रुग्णालयांमध्येदेखील मृत्यूची आकडेवारी येते. तसेच खासगी रुग्णालयांची आकडेवारी प्राप्त होत नसली तरी तेथील मृत्यूचे प्रमाण मोठे आहे.
हिरे वैद्यकीय महाविद्यालयात महानगरपालिकेच्या रुग्णवाहिकेतून ठरलेल्या ठिकाणी मृतदेह नेले जातात. १०८ रुग्णवाहिकेतूनदेखील मृतदेह नेले जातात. शववाहिका चालकांना सुरक्षा किटसह सॅनिटायझर, मास्क दिला जातो. सुरक्षेची साधने असली तरी त्यांचा मृत्यूसोबतचा रिस्की प्रवास थक्क करणारा आहे.
जिल्ह्यात एकूण १५७ रुग्णवाहिका असल्याची परिवहन विभागाकडे नाेंद आहे. त्यात ४९ सरकारी आणि १०८ च्या १८ रुग्णवाहिकांचा समावेश आहे. १०८ ने ६ रुग्णवाहिका कोरोना सेवेसाठी दिल्या आहेत.
सुरक्षा किटसह सॅनिटायझर, मास्कचा नियमित वापर
कोरोना रुग्णांसह कोराेनामुळे मृत्युमुखी पडलेल्यांसाठीदेखील सेवा दिली जाते. पीपीई किट दिले आहेत. सुरक्षेची इतर साधनेदेखील मिळाली आहे. स्वत:च्या जिवासह कुटुंबांचीही काळजी असते. परंतु कोरोनाच्या या आपत्तीमध्ये रुग्णसेवा करणेदेखील गरजेचे आहे. आपण काहीतरी चांगले करीत असल्याचे समाधान आहे.
- १०८ रुग्णवाहिका चालक
इतर व्याधी असलेल्या रुग्णांसह कोरोना रुग्णांची आणि मृतांचीदेखील वाहतूक करावी लागते. पीपीई किट दिलेले नाहीत. परंतु मास्क आणि सॅनिटायझर मात्र दिले आहे. दिवसातून विविध ठिकाणी १० ते १५ फेरी होतात. अनेकदा मदत करण्यासाठी रुग्णाशी, रुग्णांच्या नातेवाईकांशी संपर्क येतो. धोका तर आहेच. पण रुग्णसेवाही महत्वाची.
- खासगी रुग्णवाहिका चालक
गेल्या वर्षभरापासून आम्ही दोन-तीन चालक हिरे वैद्यकीय महाविद्यालयात शववाहिका चालवितो. दरराेज सकाळपासून सायंकाळपर्यंत मृतदेह ठरलेल्या ठिकाणी न्यावे लागतात. पीपीई किट आहे. आम्ही जिवाची पर्वा न करता सेवा बजावत असलो तरी कुटुंबाची मात्र काळजी असते. कोरोनाचा संसर्ग लवकर जावा.
- मनपा रुग्णवाहिका चालक
रुग्णसेवेसोबत स्वत:चीही काळजी घ्या
शववाहिकेवरील चालक स्वत:ची काळजी घेत नसल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. केवळ मास्क लावला तरी श्वास घेण्यास त्रास होतो. पीपीई किट वापरले तर उकाड्यामुळे वाहन चालविणे कठीण होईल अशा प्रतिक्रिया काही चालकांनी व्यक्त केल्या आहेत. हे धक्कादायक आहे. दुसऱ्यांसाठी जिवावर उदार होऊन काम करणाऱ्यांचे काैतुकच आहे. पण त्यांनी स्वत:ची आणि कुटुंबाचीही काळजी घेणे गरजेचे आहे.