धुळे : येथील जिल्हा रुग्णालयाच्या परिसरात कोरोना चाचणी व लसीकरण केंद्र एकाच छताखाली सुरू असल्याचा गंभीर प्रकार घडत आहे. ज्या परिसरात रुग्ण कोरोना चाचणी करण्यासाठी येतात त्या ठिकाणीच लसीकरणही केले जात असल्याने कोरोनाचा प्रादुर्भाव अधिक वाढण्याची शक्यता आहे.
साक्री रोड परिसरातील जुन्या जिल्हा रुग्णालयात कोरोनाच्या रुग्णवाढीच्या पहिल्या टप्प्यापासूनच कोरोनाची चाचणी करण्यात येत आहे. त्यात आरटीपीसीआर व अँटीजन चाचण्यांचा समावेश आहे. कोरोनाचे रुग्ण आढळू लागल्यानंतर सुरुवातीला भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात आरटीपीसीआर चाचणी करण्यात येत होती. त्यानंतर जिल्हा रुग्णालयात चाचणीस सुरुवात झाली होती. जिल्हा रुग्णालयातील मध्यवर्ती इमारतीत खालील मजल्यावरील बाह्य रुग्ण विभागात कोरोना चाचणी करण्यात करण्यात येते. आता लसीकरण मोहिमेला सुरुवात झाल्यानंतर याच इमारतीतील दुसऱ्या मजल्यावर कोरोना लसीकरण करण्यात येत आहे. चाचणी करणाऱ्या रुग्णांसाठी पुढच्या बाजूने तर लसीकरण करणाऱ्या नागरिकांसाठी इमारतीच्या मागच्या बाजूने प्रवेश देण्यात येतो. मात्र, एकाच परिसरात लसीकरण व चाचणी होत असल्याने कोरोना प्रसाराचा धोका निर्माण झाला आहे. कोरोना चाचणी व लसीकरण वेगवेगळ्या इमारतींत करणे गरजेचे आहे. अन्यथा, कोरोनाचा प्रसार आणखी वाढू शकतो.
महिला कुठे?
महिलांसाठी वेगळी व्यवस्था नाही. महिला व पुरुषांचे एकाच ठिकाणी लसीकरण होते आहे. तसेच चाचणी करण्यासाठी आलेले महिला व पुरुष एकाच रांगेत उभे असल्याचे चित्र दिसले. आरोग्य कर्मचारी, कोरोना योद्धे यांच्यानंतर ज्येष्ठ नागरिकांना लस टोचली जात आहे. मात्र, लसीकरणाचे केंद्र दुसऱ्या मजल्यावर असल्यानेदेखील ज्येष्ठ नागरिकांना त्रास होतो.
याला जबाबदार कोण?
एकाच इमारतीत कोरोना लसीकरण व कोरोना चाचणी होत असल्याने कोरोनाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे. ज्या ठिकाणी नागरिक उपचार घेण्यासाठी व तपासण्या करण्यासाठी येतात तेथूनच कोरोनाचा प्रसार होत असेल तर याला जबादार कोण, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
इमारत एकच, १०० मीटरपेक्षाही कमी अंतर -
चाचणी करण्यासाठी आलेले रुग्ण व लसीकरणासाठी आलेले नागरिकांचे मार्ग व मजले वेगळे आहेत. मात्र, एकाच इमारतीत दोन्ही गोष्टी सुरू आहेत. लसीकरण व चाचणीच्या ठिकाणांत १०० मीटरपेक्षाही कमी अंतर आहे. जिल्ह्यातील वाढलेली बाधितांची संख्या विचारात घेऊन प्रशासनाने कोरोना चाचणी व लसीकरण वेगवेगळ्या इमारतींत व दुसऱ्या परिसरात करणे आवश्यक आहे. कोरोना चाचणी जिल्हा रुग्णालयातच करावी; मात्र लसीकरण दुसऱ्या ठिकाणी करावे, असा एक पर्याय पुढे येतो आहे.