धुळे : महागाईच्या विरोधात भारतीय कम्युनिस्ट पक्षाने बुधवारी आंदोलन केले. भाकपच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाहेर जोरदार घोषणाबाजी करीत निदर्शने केली.
यावेळी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. त्यात म्हटले आहे की, महागाई वाढण्यास केंद्र सरकार जबाबदार असून केंद्राने त्वरित दिलासा देणारे निर्णय घ्यावेत, नाही तर असंतोषाचा उद्रेक होईल, असा इशारा दिला आहे.
इंधन, औषधे आणि जीवनावश्यक वस्तूंच्या किमती कमी कराव्यात, कोरोना प्रतिबंधक लस सर्वांसाठी उपलब्ध करून द्यावी, घरगुती गॅसच्या किमती कमी कराव्यात, पात्र अतिक्रमणधारकांना बॅंकेकडून अर्थसहाय्य मिळवून द्यावे, गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजनेचा लाभ मिळवून द्यावा आदी मागण्या निवेदनात केल्या आहेत.
या आंदोलनात वसंत पाटील, हिरालाल परदेशी, साहेबराव पाटील, हिरालाल सापे, रमेश पारोळेकर, पोपटराव चाैधरी, मदन परदेशी, किशोर सूर्यवंशी, रामचंद्र पावरा, अर्जुन कोळी, अशोक बाविस्कर आदी सहभागी झाले होते.