कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने धडक दिली असून, दोंडाईचा शहरासह परिसरातील गावात मोठ्या प्रमाणात संसर्ग झाला आहे. दिवसागणिक रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. यामुळे दोंडाईचा उपजिल्हा रुग्णालयावर मोठा ताण पडत आहे. हा ताण कमी करण्यासाठी दोंडाईचा वरवाडे नगरपरिषदेच्या साहाय्याने १०० बेडचे कोविड सेंटर उभारण्यात आले आहे. यासाठी कामगार कल्याण मंडळाचे भवन ताब्यात घेतले आहे. त्यात ५० बेड हे ऑक्सिजन सुविधांसह आहेत, तर ५० बेड हे नॉन ऑक्सिजन बेडचे आहेत. यात दोंडाईचा नगरपालिकेने कामगार कल्याण मंडळात बेड, वीज, पाणी, स्वच्छता अशा सर्व मूलभूत सुविधा केवळ ३ दिवसांत उपलब्ध करून दिल्या आहे; तर औषधी, वैद्यकीय कर्मचारी, आदी वैद्यकीय सुविधा या तालुका वैद्यकीय अधिकारी पुरवत आहेत. यामुळे कोरोनामुळे त्रस्त झालेल्या दोंडाईचा शहर व परिसरातील रुग्णांना काहीअंशी दिलासा मिळाला आहे. या कोविड सेंटरमध्ये ३०-३५ रुग्ण विनाऑक्सिजन बेडवर आहेत, तर १० रुग्ण ऑक्सिजन बेडवर आहेत. यासाठी उपजिल्हा रुग्णालयातून रुग्णांना याठिकाणी पाठविले जाते.
गेल्या आठवड्यात कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावासंदर्भात नगरपालिका कार्यालयात जिल्हाधिकाऱ्यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक झाली. त्यात उपजिल्हा रुग्णालयावर वाढता ताण कमी करण्यासाठी अजून कोविड सेंटर असावे, अशी मागणी झाली होती. त्यानुसार जिल्हाधिकाऱ्यांनी कोविड सेंटर सुरू करावे, असे आदेश दिले होते. त्यानुसार आज येथे ५० ऑक्सिजन बेड सुविधेसह कोविड सेंटर सुरू झाले आहे, असे मुख्याधिकारी प्रवीण निकम यांनी सांगितले.