धुळे : येथील हिरे वैद्यकीय महाविद्यालयाच्या मागील बाजूस असलेल्या स्मशानभूमीत आतापर्यंत ७५० मृतांवर अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत. त्यासाठी महापालिकेला तब्बल ९ लाख रुपये इतका खर्च आला आहे.
पहिली लाट व दुसरी लाट मिळून जिल्ह्यात एकूण ४२ हजारांपेक्षा अधिक रुग्ण आढळले आहेत. तर ६६७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. स्मशानभूमीत झालेल्या अंत्यसंस्काराची संख्या व मृतांची शासनाकडे आकडेवारी यात मोठी तफावत दिसून येत आहे. आरोग्य विभागाकडील आकडेवारीनुसार जिल्ह्यात एकूण ६६७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मात्र केवळ हिरे महाविद्यालयामागील स्मशानभूमीतच ७५०पेक्षा अधिक मृतांवर अंत्यसंस्कार झाले आहेत.
कोरोनाने मृत्यू झालेल्या रुग्णांवर अंत्यसंस्कार करण्याची जबाबदारी महापालिकेकडे आहे. शहरातील तसेच ग्रामीण भागातील मृतावरदेखील पालिका अंत्यसंस्कार करत आहे. जिल्ह्यात १० एप्रिल रोजी कोरोनाच्या पहिल्या रुग्णाचा मृत्यू झाला होता. मृत रुग्णाचे पार्थिव देवपूर येथील स्मशानभूमीत नेण्यात आले होते. मात्र कोरोनामुळे मृत्यू झालेला असल्यामुळे तेथील स्थानिक रहिवाशांनी अंत्यसंस्कारास विरोध केला होता. तसेच पार्थिव असलेल्या रुग्णवाहिकेवर दगडफेकही केली होती. त्यानंतर सामाजिक कार्यकर्ते प्रवीण अग्रवाल यांनी अंत्यसंस्कारासाठी जागा उपलब्ध करून दिली होती. त्या ठिकाणी गेल्या दीड वर्षात ७५० मृतांवर अंत्यसंस्कार झाले आहेत. सध्या दररोज दोन ते तीन अंत्यसंस्कार होत असल्याची माहिती मिळाली.
एका अंत्यसंस्काराचा खर्च तीन हजार
- एका अंत्यसंस्कारासाठी तीन हजार रुपयांचा खर्च होत असल्याची माहिती महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी दिली.
- एक मृतावर अंत्यसंस्कारासाठी ९ मण लाकूड महानगरपालिकेकडून देण्यात येते. त्यासाठी २ हजार ६०० रुपये इतका खर्च येतो. तसेच गौऱ्याही देण्यात येतात.
- महानगर क्षेत्रातील मृतांसोबतच ग्रामीण भागातील मृतांवरदेखील या ठिकाणी अंत्यसंस्कार केले जातात.
स्वछता विभागातील कर्मचाऱ्यांवर जबादारी...
- अंत्यसंस्कार करण्याची जबादारी महानगरपालिकेच्या आरोग्य विभागातील कर्मचारी पार पाडत आहेत.
- मनपाचे साहाय्यक आरोग्य अधिकारी लक्ष्मण पाटील व पाच कर्मचारी अंत्यसंस्काराच्या कामात गुंतले आहेत.
- शासकीय आकडेवारीनुसार मृतांची संख्या कमी झाली असली तरी दररोज दोन ते तीन अंत्यसंस्कार होत असल्याची माहिती मिळाली.
प्रतिक्रिया...
कोरोना संशयित रुग्णाचा मृत्यू झाला तरी कोविड स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येतात. त्यामुळे शासकीय आकडेवारी व स्मशानभूमीतील अंत्यसंस्काराच्या संख्येत तफावत दिसते. जर डेथ ऑडिट झाले तर वस्तुस्थिती लक्षात येईल.
- डॉ. विशाल पाटील, जिल्हा नोडल अधिकारी
सुरुवातीपासूनच जिल्हाभरातील रुग्ण शहरात उपचारांसाठी येत होते. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी मृत पार्थिवावर प्रवीण अग्रवाल यांनी उपलब्ध करून दिलेल्या जागेत अंत्यसंस्कार करत आहोत. त्या ठिकाणी सर्व सुविधा देण्यात येत आहेत. कर्मचारी अहोरात्र मेहनत घेत आहेत.
- अजीज शेख, आयुक्त
हिरे वैद्यकीय महाविद्यालयाच्या मागे असलेल्या जागेत शहरासोबतच ग्रामीण भागातील मृतांवरदेखील अंत्यसंस्कार केले जात आहेत. त्या ठिकाणी जागा उपलब्ध झाल्यामुळे कोरोनाचा अधिक प्रादुर्भाव झाला नाही. स्मशानभूमीत पुरेसे लाकूड उपलब्ध करून दिले आहे. तसेच विजेची व्यवस्था करीत आहोत.
- संजय यादव, जिल्हाधिकारी