धुळे : कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे बहुतांश नागरिक मागील दीड वर्षांपासून घरातच आहेत. कोरोनाची भीती व वाढलेल्या स्क्रीन टाइममुळे झोप उडालेल्या नागरिकांची संख्या वाढली आहे.
कोरोनाबाबत मोठ्या प्रमाणात जनजागृती झाली आहे. जिल्ह्यातील हजारो रुग्ण कोरोनावर मात करून ठणठणीत बरे झाले आहेत. मात्र तरीही कोरोनाची भीती कमी होताना दिसत नाही. कोरोनाच्या भीतीमुळे अनेक नागरिकांना निद्रानाशेचा त्रास होतो आहे. तसेच घरातच अडकून पडल्यामुळे मनोरंजनाचे साधन म्हणून मोबाईलला प्राधान्य दिले गेले होते. मात्र मोबाईलचा वापर वाढल्याने त्याचे दुष्परिणाम आता समोर येऊ लागले आहेत. कोरोनामुळे मागील दीड वर्षांपासून चित्रपटगृहांना टाळे लागले आहे. त्यामुळे अनेक वेब सिरीज मोबाईलवरच प्रदर्शित होत आहे. या सिरीज पाहणाऱ्या तरुणांची संख्या मोठी आहे. तसेच यूट्यूबवर सर्फिंग करणाऱ्यांची संख्याही वाढली आहे. सतत मोबाईलला खिळून राहिल्यामुळे झोप कमी होत असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. पुरेशी झोप होत नसल्याने ताण - तणाव व चिडचिड वाढली आहे.
झोप कमी झाल्याचे दुष्परिणाम -
झोप कमी झाल्याने दिनचर्या बिघडते.
झोप कमी झाल्यास चिडचिड वाढते.
झोप कमी झाल्याने ॲसिडिटी वाढते.
मानसिक व शारीरिक थकवा जाणवतो.
झोप का उडते -
१ मोबाईल किंवा टीव्ही च्या स्क्रीनला सतत खिळून राहिल्याने झोप उडते. तसेच नैराश्य व ताण - तणावामुळेही झोप उडते.
२ एखाद्या घटनेची भीती घेतली तर झोप कमी होते. कोरोनाच्या भीतीमुळे झोप उडाल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत.
३ रात्री मोबाईलमध्ये गेम खेळायची सवय असेल तर त्याचा परिणाम झोपेवर होतो. निद्रानाशदेखील जडू शकतो. पुरेशी झोप न झाल्यामुळे ताण - तणाव वाढतात.
डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय झोपेची गोळी नको -
झोप लागत नसेल तर परस्पर गोळी घेऊ नये. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच गोळी घ्यावी. नैसर्गिक झोप येण्यासाठी प्रयत्न करावे.
झोपेची गोळी घेण्यासाठी डॉक्टरांचे प्रिस्क्रिप्शन बंधनकारक करण्यात आले आहे. औषध विक्रेत्यांनी त्याचे पालन करावे.
- झोपण्यापूर्वी आवडीचे संगीत ऐकावे.
- नैसर्गिक झोपेसाठी प्रयत्न करावे.
- रात्री लवकर झोपण्याचा प्रयत्न करावा.
- रात्री जास्त वेळ मोबाईल बघू नये.
प्रतिक्रिया -
स्क्रीन टाइम वाढल्याने झोप न लागण्याचे प्रमाण वाढले आहे. योगासने प्राणायम केली तर चांगली झोप लागू शकते. तसेच कुटुंबासोबत वेळ घालवणे देखील फायदेशीर ठरू शकते.
- डॉ. विशाल पाटील
कोरोनाच्या निर्बंधामुळे नागरिक प्रदीर्घ काळापासून घरात आहेत. त्यामुळे मोबाईलचा वापर वाढला आहे. मोबाईलचा अतिवापर धोकादायक ठरू शकतो. त्यामुळे ताण - तणाव वाढतात. त्रास जाणवल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
- डॉ. संजय शिंदे