नरडाणा येथील मूळ रहिवासी असलेल्या राहुल पाटील याचे शिक्षण बीई सिव्हिल झाले आहे. त्याच्या मित्राच्या घरचे हिमाचल प्रदेशात गिर्यारोहणाला गेले होते. त्यांनी अनुभव कथन केले. त्यामुळे राहुललादेखील ट्रेकिंगची आवड निर्माण झाली. या आवडीतूनच त्याने २०१८ मध्ये हिमाचल प्रदेशातील सारपास हे १३ हजार ८०० फूट उंचीवरील सर्वात उंच शिखर सर केले होते. हे शिखर चढून उतरण्यासाठी त्यांना सात दिवसाचा कालावधी लागला, तर आता नुकतेच त्यातने उत्तराखंडमधील केदारकंठा हे १२ हजार ५०० फूट उंचीवरील शिखर सर केले. पर्वतारोहणासाठी यूथ होस्टेल ऑफ इंडिया या दिल्लीस्थित सरकारी संस्थेत अगोदर नोंदणी करावी लागते. देशातील अनेक गिर्यारोहक या ठिकाणी नोंदणी करीत असतात. एका गटामध्ये ८-१० गिर्यारोहकांचा सहभाग असतो. वेगवेगळ्या राज्यातील, प्रांतातील गिर्यारोहक एकत्र येत असल्याने त्यांची संस्कृती, परंपरा या गोष्टी कळण्यास मदत होत असते. शिवाय हे शिखर चढत असताना त्या राज्यातील नागरिकांच्या माणुसकीचे दर्शन घडत असते. रस्ता चुकल्यास त्या भागातील नागरिक आपल्याला मदत करीत असतात. या गिर्यारोहणामुळे वातावरणाशी कशा प्रकारे जुळवून घ्यावे याचा अनुभव येतो. सारपास असो अथवा केदारकंठा, हे दोन्ही शिखर चढताना एकेका दिवशी पाच-सहा किलोमीटरची चढाई करायचो. त्यानंतर एका बेसमेंटवर मुक्काम करून पुन्हा दुसऱ्या दिवशी तोच क्रम करायचा. शिखर चढत असताना आपल्या सोबतींमुळे पर्वत सर करणे शक्य होते. पर्वत सर करण्याचा आनंद वेगळाच असतो. हिमाचल, उत्तराखंड प्रदेशातील मोठे पर्वत चढण्यापूर्वी धुळ्याजवळ असलेल्या लळिंग किल्ला चढण्याचा सराव केला. नियमित केलेल्या सरावामुळे आपणही मोठे शिखर चढू शकतो, असा आत्मविश्वास मनामध्ये निर्माण झाला. त्याच्याबळावरच पहिल्यांदा सारपास हे सर्वात उंच शिखर चढून गेला. यात यशस्वी झाल्याने, अजून मोठे शिखर चढण्याची उत्सुकता निर्माण झाली. शिखर सर केल्याने, मन प्रसन्न होते. माणूस आपल्या नेहमीच्या विचारातून मुक्त होतो, एका वेगळ्या विश्वात रमत असतो.
राहुल पाटील, गिर्यारोहक, धुळे