धुळे : भटक्या विमुक्त समाजातील नागरिकांचे सर्वेक्षण करून त्यांची स्वतंत्र जनगणना करावी, अशी मागणी माजी मंत्री आ. संजय राठोड यांनी केली आहे. ते येथील धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघ कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.
भटक्या विमुक्त प्रवर्गातील नागरिक मागास व असंघटित आहेत. त्यामुळे ते आपल्या मागण्यांसाठी रस्त्यावर उतरू शकत नाहीत. बंजारा, नाथजीगी, नंदीवाले अशा जातींचा समावेश या प्रवर्गात होतो. दोन वेळच्या जेवणासाठी त्यांचा संघर्ष सुरू असतो. महाराष्ट्रात स्थापना झालेल्या रेणके व बापट आयोगानेदेखील हा समूह मागास असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे भटक्या विमुक्त जातींचे सर्वेक्षण होऊन स्वतंत्र जनगणना करण्यात यावी याबाबत विधानसभेतही आवाज उठवणार असल्याचे आ. राठोड यांनी सांगितले.
भाजपचे आंदोलन कुणाच्या विरोधात?
आ. राठोड यांनी या वेळी भाजपने केलेल्या चक्काजाम आंदोलनावरही टीका केली. ओबीसींचे आरक्षण पुन्हा मिळायलाच हवे. ओबीसी आरक्षणाला पाठिंबा असल्याची भूमिका त्यांनी मांडली. ओबीसी आरक्षणासाठी आवश्यक असलेला इंपिरिअल डाटा हा केंद्र शासनाकडे आहे. त्यांनी तो डाटा दिला तरच ओबीसी आरक्षण मिळणार आहे. त्यामुळे भाजप कुणाच्या विरोधात आंदोलन करत आहे, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.