चिमठाणे : येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या कारभारामुळे ग्रामस्थ अक्षरश: हैराण झाले आहेत. चिमठाणे गावाला लागून असलेली १० ते १२ गावे या आरोग्य केंद्राला जोडण्यात आली आहेत. मात्र, अपघाताच्या घटना घडल्यास वेळेवर वैद्यकीय अधिकारी उपलब्ध होत नाहीत. तर काही वेळेस वाहनात डिझेल नसते, अशा असंख्य समस्यांनी नागरिक त्रस्त झाले आहेत. येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील समस्या अनेक वर्षांनंतरही ‘जैसे थे’ आहेत. त्यावर कोणतीही उपाययोजना केल्या जात नसल्याने यातून आरोग्य विभागाची उदासीनता दिसून येत आहे. ग्रामस्थांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत असून आरोग्य विभागाने तत्काळ गांभीर्याने लक्ष घालण्याची मागणी होत आहे.येथील आरोग्य केंद्रात प्रसुतीसाठीसाठी दाखल झालेल्या महिलांकडे देखील लक्ष दिले जात नाही. पाण्याची टाकी अनेक दिवसांपासून खराब झाली आहे. त्याकडे दुर्लक्ष करून आरोग्य केंद्रात मनमानी कारभार सुरु आहे. परिसरात घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. त्याकडेही दुर्लक्ष होत आहे. रुग्णवाहिकेचे टायर खराब झाले असून त्यासाठी मागणी केली आहे; परंतु जिल्हा परिषदेकडून अजून या रुग्णवाहिकेचे टायर मिळालेले नाही, असे सांगण्यात आले. ज्यांची रात्री ड्युटी असते ते अधिकारी देखील अनेक वेळा दांडी मारतात. काही तरी कारणे दाखवून बाहेरच असतात, असे रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांचे म्हणणे आहे.चिमठाणे परिसराची मोठी लोकसंख्या असून ग्रामस्थांना वेळीच आरोग्य सुविधा मिळत नसल्याने या आरोग्य केंद्राचा उपयोग तरी काय, असा सवाल ग्रामस्थांकडून उपस्थित होत आहे. याकडे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाºयांनीच गांभीर्याने लक्ष घालून रुग्णांच्या जीवाशी सुरु असलेला खेळ थांबवावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
चिमठाणे : प्राथमिक आरोग्य केंद्र समस्यांच्या गर्तेत, ग्रामस्थ हैराण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2019 22:51 IST
रुग्ण सेवेचा बोजवारा
चिमठाणे : प्राथमिक आरोग्य केंद्र समस्यांच्या गर्तेत, ग्रामस्थ हैराण
ठळक मुद्देdhule