धुळे : मनरेगा योजनेतून जलसंधारण, मृदसंधारणासह शाळा कंपाऊंड बांधकामासारखी विविध २८ प्रकारची कामे एकत्रिकरणातून करण्यास मान्यता देण्यात आली आहेत. दुष्काग्रस्त गावात मनरेगाची कामे करुन रोजगारसह लोकोपयोगी कामांची निर्मिती करावी, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी जिल्ह्यातील सरपंचांशी संवाद साधताना केले.मुख्यमंत्री फडणवीस यांनी शनिवारी'आॅडीओ ब्रीज सिस्टम'द्वारे जिल्ह्यातील साधारण ४५ सरपंचांशी मोबाईलवरुन थेट संवाद साधून त्यांच्याशी दुष्काळ निवारणाच्या उपाययोजनांसंदर्भात चर्चा केली. तसेच गावागावांमध्ये निर्माण झालेल्या पाणीटंचाईच्या अडचणी समजून घेतल्या. या संवादात जिल्हा प्रशासनातील अधिकाऱ्यांचाही सहभाग होता.यावेळी मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, राज्यात निर्माण झालेल्या दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर टंचाईसंदभार्तील कोणत्याही प्रस्तावावर विनाविलंब निर्णय घ्यावा. प्रशासन आणि लोकांच्या एकत्रित सहभागातून या परिस्थितीवर निश्चित मात केली जाईल, त्यासाठी सर्वांनी एकदिलाने काम करावे, असे आवाहन त्यांनी केले. २०१८ ची लोकसंख्या व जनावरांची संख्या लक्षात घेवून आवश्यक अतिरिक्त टँकर व जनावरांना मागणीनुसार तात्काळ चारा उपलब्ध करुन द्यावा.जिल्ह्यातील बंद पडलेल्या योजनाही विशेष दुरुस्ती योजनेमधून सुरु करुन गावकऱ्यांना टंचाईच्या काळात तातडीचा दिलासा देता येईल, मागणी येताच तहसीलदार, गटविकास अधिकारी यांनी विनाविलंब असे प्रस्ताव मान्य करावेत, जिल्हा प्रशासनाने प्रत्येक तक्रारींची नोंद घेऊन कार्यवाही करावी व तसा अहवाल आपणास सादर करावा, अशा सूचनाही मुख्यमंत्र्यानी यावेळी दिल्या.पाण्यासाठी आधी प्राधान्य द्याजिल्ह्यांमधील पाणीसाठे पिण्याच्या पाण्यासाठी आहेत. त्यामुळे कोणी बेकायदेशीररित्या पाण्याचा उपसा करत असेल तर त्यावर कार्यवाही करण्याच्या सूचनाही मुख्यमंत्र्यांनी दिल्या. पिण्याच्या पाण्यासाठी निधी तसेच आवश्यक तेथे बोअरवेलची संख्या वाढविण्यात यावी. जिल्ह्यांमध्ये जल संधारणाची कामे आणि आवश्यकतेनुसार जनावरांसाठी चारा छावण्या सुरु करण्यात याव्यात, टंचाई निवारणाच्या तातडीच्या उपाययोजनांवर ४८ तासांच्या आत कार्यवाही करण्यात यावी, अशा सूचनाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिल्या.यावेळी मुख्य सचिव यु.पी.एस. मदान, पाणीपुरवठा विभागाचे अपर मुख्य सचिव श्यामलाल गोयल, जलसंधारण आणि रोहयो विभागाचे सचिव एकनाथ डवले, अनुपकुमार, ब्रिजेश सिंह, किशोरराजे निंबाळकर आदी उपस्थित होते.
मुख्यमंत्र्यांनी साधला जिल्ह्यातील ४५ सरपंचांशी मोबाईलव्दारे संवाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2019 22:34 IST