दूध उत्पादनात धुळे जिल्ह्याची स्थिती समाधानकारक आहे. मुक्त गोठा ही संकल्पना ग्रामीण भागात रूजत आहे. सद्य:स्थिती पाहता काहीतरी करावे, या हेतूने युवकवर्ग दुग्ध व्यवसायाकडे वळत आहे. परंतु त्याच्याकडे असलेल्या जनावरांवरच उपचार होऊ शकत नाही, हे वास्तव आहे.
११८पशुवैद्यकीय दवाखाने
जिल्ह्यात राज्य शासनाचे व जिल्हा परिषदेचे श्रेणी एक व श्रेणी २ असे एकूण ११८ पशुवैद्यकीय दवाखाने आहेत.
अनेक पदे रिक्त पशुसंवर्धन विभागांतर्गत ११३ पदे रिक्त आहेत. सहायक आयुक्ताची ५ पदे मंजूर असून, ती कार्यरत असून दोन पदे रिक्त आहेत. तर पशुधन विकास अधिकाऱ्याची ४९ पदे मंजूर असून, आतापर्यंत १५ भरण्यात आलेली असून, ३४ पदे रिक्त आहेत. तसेच सहायक पशुधन विकास अधिकारीपदाची १५पदे मंजूर असून, त्यापैकी दहा भरलेली असून, पाच रिक्त आहेत. पशुधन पर्यवेक्षकाची ८९ पदे असून, त्यापैकी ५१ भरलेली असून, ३९ रिक्त आहेत. याशिवाय परिचरचे ५१ पदे असून १८ भरलेली आहेत. तर ३३ रिक्त आहेत.
अनेक गावांची जबाबदारी
एका पशुधन विकास अधिकारी, पशुधन पर्यवेक्षक यांच्याकडे ३-४ गावातील दवाखान्यांची जबाबदारी आहे. एका दवाखान्यांतर्गत अनेक गावांचा समावेश होत असतो. त्याचे अंतरही ३० ते ४० किलोमीटर असते. अशावेळी एका गावाहून दुसऱ्या गावात जातांना पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांना तारेवरची कसरत करावी लागते.
रिक्त पदे त्वरित भरावीत
जिल्ह्यातील पशुधनाची संख्या लक्षात घेता, त्यांच्यावर उपचार करणाऱ्या वैद्यकीय अधिकाऱ्यांची संख्या खूपच कमी आहे. जिल्ह्यातील रिक्त पदे त्वरित भरण्यात यावीत, अशी मागणी होऊ लागली आहे.