कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने राज्य शासनाने सर्वच धार्मिक कार्यक्रमांवर बंदी घातलेली आहे. त्यामुळे सगळे सण-उत्सव माेजक्या भाविकांच्या उपस्थितीत साजरे करण्यात येत आहेत.
हनुमान जयंतीनिमित्त शहरातील सर्वच मंदिरांमध्ये सकाळी हनुमानाला अभिषेक करून, सूर्योदयापूर्वी जन्मोत्सव साजरा केला. यावेळी पुजाऱ्यासह मंदिरांमध्ये मोजक्या भाविकांची उपस्थिती होती. उपस्थित भाविकांना प्रसादाचे वाटप करण्यात आले होते.
मात्र, भाविक नसले तरी मंदिरांमध्ये आकर्षक सजावट करण्यात आलेली हेाती. रांगोळ्या काढण्यात आल्या हाेत्या.
जन्मोत्सव झाल्यानंतर दिवसभर मंदिराबाहेर उभे राहून भाविकांनी मारुतीचे दर्शन घेतले. यावेळी कोरोनाच्या नियमांचे तंतोतंत पालन करण्यात आले.
कोरोनाचे संकट टळू देण्याची केली प्रार्थना
मालपूर : शिंदखेडा तालुक्यातील मालपूर येथे भगवा मारोती चौकात, गावाचे दैवत पवनपुत्र हनुमान मंदिरात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हनुमान जयंतीचा कार्यक्रम आटोपशीर घेण्यात आला. दरवर्षीच्या रूढी, परंपरा बाजूला करत फक्त तीनच मान्यवरांच्या उपस्थितीत ग्रामपुरोहित किशोर महाराज पुराणिक यांनी पूजापाठ, मंत्रोच्चार केले. नवीन शेंदूर लेपन, अभिषेक, नवीन वस्त्र परिधान करून योगेश पवार यांनी ५६ प्रकारच्या नैवेद्याचा भोग दाखविला आला. यावेळी अमित पवार, शिवाजी जाधव उपस्थित होते. महाआरतीने कार्यक्रमाची सांगता झाली. गावावरील कोरोनाचे संकट दूर करण्याची प्रार्थना संकटमोचकापुढे करण्यात आली.