दोंडाईचा व त्यालगतच्या ग्रामीण भागात कोरोनाचा कहर वाढतच आहे. उपजिल्हा रुग्णालय अपुरे पडू लागले आहे. रुग्णांना आता बेड मिळणे कठीण झाले आहे. उपजिल्हा रुग्णालयाने घेतलेले पाच-सहा दिवसांचे स्वॅब अहवाल बुधवारी मिळाले. अहवाल उशिरा मिळत असल्याने स्वॅब देऊनही बरेच रुग्ण दोडाईचात फिरत असताना दिसतात. त्या मुळे ते कोरोनावाहक मोठ्या प्रमाणात ठरत असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. उशिरा अहवाल येत असल्याने रुग्ण व त्याच्या घरातील लोक मोठ्या चिंतेत वावरतात. त्यामुळे अहवाल लवकर मिळावा ही मागणी आहे.
उपजिल्हा रुग्णालयात ५४१ रुग्णांचे स्वॅब व अँटिजन टेस्ट घेण्यात आली. त्यात १२९ नवीन कोरोनाबाधित रुग्ण आढळून आलेत. कोरोनाबाधित नवीन रुग्णांचे प्रमाण २४ टक्क्यांनी वाढले आहे. या धक्कादायक अहवालाने नागरिकांत चिंतेचे व भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. ११ ते १३ या वयोगटातील शाळकरी विद्यार्थ्यांत पण कोरोनाचा संसर्ग वाढत आहे. काही शिक्षकही कोरोनाबाधित आढळून आले आहेत. एकंदरीत लहान बालके, शाळकरी मुले, तरुण व ज्येष्ठ नागरिकांतही कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने सर्वच घटकांत चिंतेचे वातावरण दिसत आहे. दोडाईचातील जवळजवळ असा एकही परिसर दिसत नाही, जेथे कोरोना संसर्ग झाला नाही. तरीही बरेच लोक नियमांचे पालन करताना दिसत नाही. बऱ्याच दुकानांत आजही गर्दी दिसून येते. बरेच जण आजही मास्क लावताना, सामाजिक अंतर ठेवताना दिसत नाहीत. सॅनिटायझर बऱ्याच दुकानांत, शासकीय कार्यालयांत हद्दपार झालेले दिसत आहे. बसेस, खासगी वाहतूक करणारी वाहने यात गर्दी दिसते. त्यातही बरेच जण मास्क वापरतच नाही, परंतु त्यांच्यावर कारवाई होत नाही. ही कारवाई सक्तीचे होणे गरजेचे आहे.
आजच्या परिस्थितीत सिंधी कॉलनी, राऊळनगर, पटेल कॉलनी, कोठारी पार्क, बंबनगर, सर्वोदय कॉलनी, हुडको, संत कबिरदासनगर, वृंदावन कॉलनी, पाटील गल्ली, म्हादेवपुरा, सोनार गल्ली, श्रीकृष्ण कॉलनी, औदुंबर कॉलनी, हस्ती कॉलनी आदी ठिकाणी कोरोना संसर्ग अधिक दिसत आहे. बुधवारच्या अहवालानुसार ६० महिला व ६९ पुरुषांत कोरोनाबाधित आढळून आले आहेत. एकंदरीत कोरोनाचे वाढते संकट दोडाईकरांच्या चिंतेत भर टाकणारे आहे.