धुळे : साक्री येथे पूर्ववैमनस्यातून चाैघांनी केलेल्या मारहाणीत दाने जण जखमी झाले आहेत. हल्लेखोरांनी जातीवाचक शिवीगाळ केल्याने त्यांच्याविरुद्ध पोलिसांनी ॲट्राॅसिटीचा गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी तीन संशयितांना अटक करण्यात आली आहे.
साक्री येथे भाडणे रोडवर एका कापड दुकानाजवळ शनिवारी सायंकाळी ७.३० वाजेच्या सुमाराला ही घटना घडली. भाडणे रोडवर राहणारे विशाल निंबा महाले, पवन प्रकाश जाधव, उमेश दीपक बाबर आणि विनोद राजू शिंदे यांनी मागील भांडणाची कुरापत काढून राकेश भाईदास खरात यांना मारहाण करण्यास सुरुवात केली. दरम्यान राकेश खरात यांचा भाऊ रमेश भांडण सोडविण्यासाठी धावून आला. त्यावेळी विशाल महाले याने बॅटच्या साहाय्याने डोक्यावर वार केली. तसेच पवन प्रकाश जाधव याने बेल्टच्या साहाय्याने मारहाण केली. या हल्ल्यात रमेश खरात आणि राजेंद्र धुडकू पवार हे जखमी झाले. यावेळी जातीवाचक शिवीगाळ करीत जीवे ठार मारण्याची धमकी देण्यात आली.
या घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी दिनकर पिंगळे, पोलीस निरीक्षक डी. व्ही. आहेर यांनी घटनास्थळी भेट दिली.
याप्रकरणी राकेश भाईदास खरात यांनी दिलेल्या फिर्यादीवरून चाैघांविरुद्ध साक्री पोलीस ठाण्यात रविवारी भादंवि कलम ३२४, ३२३, ५०४, ५०६, ३४ सह अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा कलम ३ (२) (५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्यातील विशाल महाले, पवन जाधव, उमेश बाबर या तिघांना रविवारी रात्री ७.५५ वाजता अटक करण्यात आली. पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी दिनकर पिंगळे करीत आहेत.