शिरपूर : शहादा येथे मंडळ अधिकारी पदावर कार्यरत असलेल्या भानुप्रिया कोळी यांचे शिरपूर येथील घर चोरट्याने फोडले. ४५ हजार रुपये किंमतीचा ऐवज घेवून पोबारा केला. चोरी झाल्याची घटना मंगळवारी लक्षात आली. दुपारी शिरपूर शहर पोलीस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला.शहादा येथे मंडळ अधिकारी या पदावर कार्यरत असलेल्या भानुप्रिया निलेश कोळी (३३) यांचे शिरपुरातील मांडळ शिवारात असलेल्या अरिहंत नगरात घर आहे. भानुप्रिया कोळी यांची प्रकृति ठीक नसल्यामुळे त्या पुण्यात उपचारासाठी गेलेल्या होत्या. त्यामुळे त्यांचे घर बंद होते. चोरट्याने ही संधी साधली. चोरट्याने घराचा कडीकोंडा तोडून घरात प्रवेश केला. संसारोपयोगी साहित्याचे नुकसान करीत घरात शोधा-शोध सुरु केली. घरातील कपाटात ठेवलेले ४५ हजार रुपये किंमतीचे सोन्या-चांदीचे दागिने घेवून पोबारा केला. चोरीची ही घटना १२ मार्च रोजी सकाळी ११ ते २२ मार्च रोजी ११ वाजेच्या सुमारास घडली.पुण्याहून परत आल्यानंतर त्यांना आपल्या घरी चोरी झाल्याचे लक्षात आले. त्यांनी तातडीने शिरपूर शहर पोलिसांना घटनेबाबत माहिती दिली. पोलिसांचे पथक, ठसे तज्ञही घटनास्थळी दाखल झाले. या घटनेची फिर्याद भानुप्रिया निलेश कोळी यांनी पोलीस ठाण्यात दाखल केली. त्यानुसार, मंगळवारी दुपारी भादंवि कलम ४५४, ४५७, ३८० प्रमाणे गुन्ह्याची नोंद करण्यात आली. पोलीस उपनिरीक्षक किरण बाºहे घटनेचा तपास करीत आहेत.
शिरपुरात मंडळ अधिकाऱ्यांचे घर फोडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2021 18:37 IST