धुळे : कोरोना विषाणूची सद्य:स्थिती आणि व संभाव्य तिसरी लाट पाहता आषाढी एकादशीनिमित्त पालखी, दिंडी भाविकांनी पंढरपूरकडे नेऊ नये, असे आवाहन सोलापूरचे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी केले आहे. त्यानुसार धुळे जिल्ह्यातील भाविकांनी पालखी, दिंडी पंढरपूरकडे नेऊ नये, असे आवाहन जिल्हाधिकारी संजय यादव यांनी केले आहे.
पंढरपूर येथे आषाढी यात्रा दरवर्षी आषाढी शुध्द एकादशी या दिवशी भरते. यावर्षी २० जुलै रोजी आषाढी यात्रा आहे. आषाढी यात्रेचा कालावधी ११ ते २४ जुलै असा राहणार आहे. राज्य शासनाने १४ जून रोजीच्या आदेशान्वये आषाढीवारी मर्यादित स्वरूपात साध्या पध्दतीने आयोजन करण्यास परवानगी दिली आहे. विठ्ठल-रुक्मिणी मंदिर ११ ते २८ जुलै या कालावधीत भाविकांना दर्शनासाठी बंद ठेवण्यात येणार आहे. तसेच सर्व पालख्या, दिंड्यांना बंदी घालण्यात आली आहे. फक्त मानाच्या १० पालख्यांना मर्यादित स्वरूपात अटी व शर्तीनुसार पंढरपूर येथे येण्यास परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे आषाढी कालावधीमध्ये पंढरपूर येथे पाच दिवसांसाठी संचारबंदी लागू करण्यात येणार आहे.
अन्य दिंडी व पालख्यांना शासनाने परवानगी दिलेली नाही. त्यामुळे त्यांना श्रीक्षेत्र पंढरपूर येथे जाता येणार नाही. आषाढीवारीनिमित्त देवस्थानात करावयाचे नित्योपचार सीमित मान्यवरांच्या उपस्थितीत व कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्याच्या दृष्टीने सामाजिक अंतर राखून व कोरोना संदर्भातील सर्व मार्गदर्शक सूचनांचे काटेकोरपणे पालन करून होणार आहे.