धुळे : वर्धा जिल्हा परिषदेचे जिल्हा आरोग्य अधिकारी डाॅ. अजय डवले यांना शिवीगाळ आणि दमदाटी केल्याप्रकरणी देवळी-पुलगाव विधानसभा मतदार संघाचे आमदार रणजीत कांबळे यांना त्वरित अटक करावी, अशी मागणी करीत महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभेच्या पदाधिकाऱ्यांनी बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयात निदर्शने केली.
जिल्हा आरोग्य अधिकारी डाॅ. डवले हे महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा युवा आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष आहेत. कोरोना महामारीच्या काळात डाॅक्टर आपल्या जीवाची पर्वा न करता रुग्णसेवा करीत असताना एका डाॅक्टरला शिवीगाळ करणे म्हणजे कोरोना योध्द्याचा अपमान आहे. त्यामुळे या घटनेचा तीव्र शब्दात निषेध केला आहे.
तैलिक महासभेच्या धुळ्यातील पदाधिकाऱ्यांनी याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन आमदार रणजीत कांबळे यांना त्वरित अटक करण्याची मागणी केली आहे. यावेळी प्रदेश महासचिव नरेंद्र चाैधरी, जिल्हाध्यक्ष कैलास चाैधरी, उपाध्यक्ष तुषार चाैधरी, सल्लागार हिरू चाैधरी, गिरीष चाैधरी, किशोरा थोरात आदी उपस्थित होते.