येथील सोनगीर शिवारातील गट क्रमांक ५२/२ या गावठाण जागेवर खरगोन ट्रान्समिशन कंपनीचे टॉवर उभारण्यात येत आहे. या कामाला ग्रामपंचायतीचे पदाधिकारी यांनी विरोध केला असताना, तहसीलदार गायत्री सैंदाणे यांनी बुधवारी प्रत्यक्ष येऊन पाहणी केली होती. सामंजस्याने मार्ग काढण्याचा सल्ला दिला होता. यावरून गावठाण जागेच्या बदल्यात साठ लाखांची कामे करून देण्याचा प्रस्ताव ग्रामपंचायतीने तयार करून कंपनीच्या अधिकाऱ्यांकडे दिला होता. ग्रामपंचायत कार्यालयात सरपंच व उपसरपंच, ग्रामविकास अधिकारी व सदस्य यांच्याशी खरगोन ट्रान्समिशन कंपनीचे डेप्युटी इंजिनीअर उदय वर्मा, वैभव पाटील यांनी चर्चा करून गावासाठी सहा लाखांची कामे करून देण्याचे आश्वासन दिले. सोनगीर मंडळाचे मंडळाधिकारी आर.बी. राजपूत, तलाठी जितेंद्र चव्हाण, यांच्या उपस्थितीत दोन्ही गटांतील वाद मिटला. ग्रामपंचायतीने टॉवरचे काम करण्यास संमती दर्शविली आहे. त्यानंतर, खरगोन ट्रान्समिशन कंपनीने टॉवरच्या कामाला सुरुवात केली. यावेळी सरपंच रुख्माबाई गोरख ठाकरे, उपसरपंच विजूबाई बडगुजर, भाजपचे तालुका उपाध्यक्ष आर.के. माळी, जिल्हा परिषद माजी सदस्य श्यामलाल मोरे, ग्रामपंचायत सदस्य अविनाश महाजन, माजी सरपंच केदारेश्वर मोरे, ग्रामपंचायत माजी सदस्य राजेंद्र जाधव, ग्रामपंचायत सदस्य विशाल कासार, ग्रामपंचायत सदस्य प्रतिनिधी श्याम माळी, उपसरपंच प्रतिनिधी धाकू बडगुजर, ग्रामपंचायत सदस्य लखन ठेलारी, पिंटू भिल, समाधान पाटील आदी ग्रामपंचायत सदस्य व उपस्थित होते.
विकास कामे करून देण्याच्या अटीवर टॉवर उभारणीस मंजुरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2021 04:23 IST