धुळे : आषाढी एकादशीनिमित्त होणाऱ्या पायी वारीला प्राथमिक स्वरूपात परवानगी द्यावी, अशी मागणी करीत वारकरी संप्रदायाने सोमवारी धुळे शहरातील क्युमाइन क्लबजवळ अभंग गाऊन आंदोलन केले. दरम्यान, धुळे जिल्हा वारकरी संप्रदायाच्या एका शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले. कोरोनाच्या संसर्गामुळे वारकरी संप्रदायाने गेल्या वर्षी पायी वारी न करता शासनाला सहकार्य केले. परंतु यावर्षी शासनाने कोरोनाचे निर्बंध शिथिल केले आहेत. त्यामुळे पायी वारीला परवानगी मिळावी, अशी मागणी बंडातात्या कराडकर यांनी केली होती. शासनाने ही मागणी फेटाळली. त्यांना पायी वारी काढण्यास निर्बंध केला. तसेच पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन स्थानबध्द केले. ही घटना अत्यंत लाजिरवाणी आहे, अशा शब्दात निषेध केला. बंडातात्या कराडकर यांनी केलेल्या मागणीचा शासनाने विचार करून सामोपचाराने हा प्रश्न मार्गी लावावा, अशी मागणी निवेदनात केली आहे.
या आंदोलनात युवराज महाराज नकाणेकर, मच्छिंद्र अहिरे महाराज भोकरकर, धुळ्याचे प्रमोद महाले महाराज, निमडाळ्याचे सतीश वाघ महाराज, अवधानचे ज्ञानेश्वर भदाणे महाराज, गाताणेचे रवींद्र महाराज, गोपाल महाराज चांदुरीकर, गोविंद महाराज बल्हाणेकर, सुभाष महाराज नकाणेकर, दीपक महाराज लळींगकर, वाडीभोकरचे जितेंद्र पाटील यांच्यासह वारकरी संप्रदायाचे भाविक सहभागी झाले होते.
वारीलाच विरोध का
कोरोनाचा संसर्ग कमी झाल्यानंतर शासनाने निर्बंध शिथिल केले. तसेच सर्व सरकारी आणि खासगी कार्यालये, दुकाने, उद्योगांना परवानगी दिली आहे. निवडणुका आणि लग्नसमांरभदेखील होत आहेत. परंतु वारीलाच विरोध का केला जात आहे, असा प्रश्न वारकरी संप्रदायाने उपस्थित केला आहे.