शहरातील आग्रारोडवरील मुख्य बाजारपेठमधील महापालिकेच्या मालकीची शंकर मार्केटला पहाटे आग लागली असल्याचे प्रथमदर्शी चैनीरोड परिसरात राहणारे व्यापारी धर्मादास जयस्वाल यांच्या लक्षात आले. यावेेळी शंकर मार्केटच्या आतील भागातून मोठ्या प्रमाणात आगीचे लोट निघत असल्याने जयस्वाल यांनी तातडीने घटनेची माहिती येथील वाॅचमनच्या लक्षात आणून दिली. त्यानंतर घटनेची माहिती महापालिका अग्निशमन विभागाला देण्यात आल्यानंतर अग्निशमन दलाचे वाहन घटनास्थळी दाखल झाले.
आगीने रूद्ररूपधारक केल्याने आगीवर नियंत्रण मिळण्यासाठी मनपाचे दाेन बंब अपूर्ण पडत असल्याने साक्री, शिरपूर, अमळनेर, मालेगाव तसेच दोंडाईचा येथील अग्निशमन दलाचे बंब मागविण्यात आले होते. मात्र शंकर मार्केटपर्यंत जाण्याचा रस्ता अरुंद असल्याने वाहने पाेहचू शकत नव्हते. त्यामुळे अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांना रस्त्यावर वाहने लागून मार्केटपर्यंत आग नियंत्रणासाठी प्रयत्न करावा लागला.
या आगीत मार्केटमधील सुदर्शन साकी सेंटर, विजय टेक्सटाइल्स, पुनीत क्लाॅथ स्टोअर्स, देवीदास ओमप्रकाश, जय मातादी क्लाॅथ स्टोअर्स, कृष्णा हॅण्डलूम, व्दारकेश क्लाॅथ, दीप एंटरप्रायजेस, गिरीश वस्त्र भांडार, शांतीलाल संतोष कुमार, गुरुजी टेडर्स आदी २५ ते ३० दुकाने जळून खाक झाली आहेत. यात सुमारे २० ते २५ कोटींचे नुकसान झाल्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. घटनेची माहिती मिळताच तलाठी योगिता चव्हाण, सी.एम.पाटील, सर्कल सागर नेमाणे, अमृत राजपूत, यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. यावेळी शंकर मार्केटचे शंकरलाल मेघराज मंदान, सुभाष रेलन, कन्हैय्या अरोरा, गुरुदयाल सदाणे उपस्थित होते.